Stampede In Movie Theater : अभिनेते अल्लू अर्जुन यांना अंतरिम जामीन

चित्रपटगृहातील चेंगराचेंगरीचे प्रकरण

उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर अल्लू अर्जुन यांना अंतरिम जामीन प्राप्त !

भाग्यनगर (तेलंगाणा) : येथील ‘संध्या’ चित्रपटगृहाच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेते अल्लू अर्जुन यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. जामीन मिळण्यासाठी अल्लू अर्जुन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला. अल्लू अर्जुन यांचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यापूर्वी भाग्यनगरच्या ‘संध्या’ चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार होता. त्या वेळी अल्लू अर्जुन हेही उपस्थित होते. त्या वेळी त्यांना पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली. त्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर घायाळ झाला. या घटनेविषयी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. (या घटनेला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व असलेले पोलीस आणि प्रशासन तेवढेच उत्तरदायी आहेत. त्यांचेही अन्वेषण होणे तेवढेच आवश्यक आहे ! – संपादक) ‘संध्या’ चित्रपटगृहामध्ये अल्लू अर्जुन उपस्थित रहाणार, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे, तर याची माहिती पोलिसांना दिली होती, असे अल्लू अर्जुन यांनी सांगितले.

अल्लू अर्जुन यांनी ११ डिसेंबर या दिवशी उच्च न्यायालयात धाव घेऊन पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रहित करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले, ‘‘या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, हे दु:खद आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मी एखाद्या चित्रपटगृहात जाणे साहजिक आहे. याआधीही मी अनेकदा चित्रपटगृहात गेलो आहे; मात्र अशा घटना कधीच घडल्या नाहीत. माझ्यावर गुन्हा नोंदवणे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला जाण्याची शक्यता आहे.’’