Jaishankar On Unrest B’desh : (म्हणे) ‘बांगलादेश अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेशी पावले उचलेल, अशी आम्हाला आशा !’

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे लोकसभेत विधान !

नवी देहली : बांगलादेशात अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांकडेही आम्ही लक्ष घातले आहे. नुकतेच आमचे परराष्ट्र सचिव ढाक्याला गेले. तेथील बैठकीतही या सूत्रावर चर्चा झाली. आम्हाला आशा आहे की, बांगलादेश अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेशी पावले उचलेल, असे उत्तर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी लोकसभेत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिले. (एकही हिंदु खासदार नाही, तर असदुद्दीन ओवैसी यांच्यासारखा खासदार असा प्रश्‍न विचारतो, हे लज्जास्पद ! – संपादक)

तसेच म्यानमारच्या सूत्रावर विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर म्हणाले, ‘‘भारत सरकार म्यानमारसमवेत केलेल्या कराराचा आढावा घेत आहे. या करारांतर्गत लोकांना एकमेकांना सीमा ओलांडण्याची अनुमती आहे; मात्र भारताने सध्या त्यावर बंदी घातली आहे.’’

हसीना यांच्या वक्तव्यापासून भारताने स्वतःला दूर केले

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बांगलादेशाचा दौरा केल्यानंतर संसदीय स्थायी समितीला सांगितले की, बांगलादेशाच्या अंतरिम सरकारवर टीका करणार्‍या शेख हसीना यांच्या वक्तव्यांना भारत समर्थन देत नाही. हसीना यांच्या विधानांमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडत आहेत. भारताचे बांगलादेशासमवेतचे संबंध कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित नाहीत. हे दोन्ही देशांच्या नागरिकांवर आधारित आहेत. शेख हसीना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वैयक्तिक उपकरण वापरत होत्या. भारताने त्यांना कोणतेही उपकरण दिलेले नाही. भारत सरकार हसीना यांना अशी कोणतीही सुविधा देत नाही, ज्याद्वारे त्या राजकीय हालचाली करू शकतील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत ! – अमेरिका

अमेरिकेच्या सरकारचे सल्लागार जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बायडेन बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच अंतरिम सरकारला अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेची निश्‍चिती करण्यास सांगितले आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशातील सुरक्षा परिस्थिती बिघडली. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही बांगलादेशाच्या सुरक्षा यंत्रणांना बळकट करण्यासाठी साहाय्य करत आहोत.

संपादकीय भूमिका

गेल्या ऑगस्टपासून आतापर्यंत बांगलादेशात जे काही होत आहे, ते पहाता अद्यापही हिंदूंचे संरक्षण करण्यात येत आहे, असे कोणतेच चित्र दिसून आलेले नाही. त्यामुळे अशी आशा ठेवणे हास्यास्पद आहे, असेच हिंदूंना वाटले, तर ते चुकीचे ठरू नये ! भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !