Disputes Over Religious Sites Across India : देशात ८ मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित !

नवी देहली : उत्तरप्रदेशातील संभल येथे असणारी शाही जामा मशीद पूर्वीचे हरिहर मंदिर आहे, असे सांगत हिंदु पक्षाकडून न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिल्यापासून मुसलमानांकडून याला हिंसक विरोध केला जात आहे. १ सहस्र वर्षांपूर्वी मुसलमान आक्रमकांनी सहस्रो मंदिर पाडून तेथे मशिदी बांधल्या होत्या. यात काशी, मथुरा आणि अयोध्या येथील प्रमुख मंदिरांचाही समावेश आहे. यांतील अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी हिंदूंनी मुक्त करून घेतली असून काशी आणि मथुरा येथील वाद न्यायालयात आहे. आता हिंदूंमध्ये जागृती झाली असून देशात अशा प्रकारे काही महत्त्वाच्या मंदिरांच्या संदर्भात हिंदूंनी न्यायालयीन लढाई प्रारंभ केली आहे. देशात १६ मोठे वाद चालू असून त्यांपैकी ९ प्रकरणे नवी आहेत. यांतील ८ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. काही वाद अद्याप न्यायालयात पोचलेले नाहीत. यांमध्ये देहलीची जामा मशीद, मध्यप्रदेशातील विदिशा येथील बिज मंडल, तसेच तेलंगाणामधील चारमिनार आणि वेमुलवाडा मंदिर यांचा समावेश आहे.

या मंदिरांच्या मुक्तीमध्ये ‘पूजा स्थळ कायदा १९९१’ हा एक मोठा अडथळा आहे. हा कायदा रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ६ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. यांवर सध्या सुनावणी चालू आहे. या कायद्याच्या कलम ४(१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे पूजा स्थळाची धार्मिक वैशिष्ट्ये कायम असावीत, जी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी अस्तित्वात होती; कुणी याचा उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावास, अशी शिक्षा होऊ शकते.

काही प्रकरणांची माहिती पुढे दिली आहे –

१.  भोजशाला (धार, मध्यप्रदेश) : येथे वाग्देवीचे (सरस्वती देवीचे) मंदिर आहे. मुसलमानांनी याला कमल मौला मशीद सांगत त्यावर नियंत्रण मिळवले आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणातून ९४ मूर्ती, प्राण्यांच्या आकृती, ३१ नाणी सापडली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

२. अजमेर शरीफ दर्गा (राजस्थान) : या दर्ग्याविषयी हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी जिल्हा न्यायालयात याचिका करून तेथे पूर्वी शिवमंदिर होते आणि ते पाडून दर्गा बांधण्यात आला. याचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी केली आहे. यावर न्यायालय सुनावणी करणार आहे.

३. जामा मशीद (फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश) : येथे कामाख्या देवीचे मंदिर होते आणि ते पाडून तेथे मशीद बांधण्यात आली. या मशिदीखाली देवतेची मूर्ती आहे. याविषयी खटला चालू आहे.

४. जामा मशीद (संभल, उत्तरप्रदेश) : श्री हरिहर मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधण्यात आली आहे. याचे सर्वेक्षण करण्यात आले असून न्यायालयात याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ५ मुसलमानांचा मृत्यू झाला.

५. अटाला मशीद (जौनपूर, उत्तरप्रदेश) : येथील अटाला देवी मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. याच्या सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

६. शम्सी जामा मशीद (बदायू, उत्तरप्रदेश) : येथे नीलकंठ महादेवाचे मंदिर पाडून ही मशीद बांधण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात खटला चालू आहे.

७. जुम्मा मशीद (मंगळुरू, कर्नाटक) : येथे पूर्वी मंदिर होते. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली असून मशिदीखाली सर्वेक्षण केल्यास मंदिराचे अवशेष सापडतील, असे यात म्हटले आहे. यावर सुनावणी चालू आहे.

८. शाही ईदगाह मशीद (मथुरा, उत्तरप्रदेश) : श्रीकृष्णजन्मभूमीवर ही मशीद बांधण्यात आली आहे. न्यायालयात सुनावणी चालू आहे.

९. कुतुबमिनार (देहली) : येथील कुव्वत-उल-मशीद २७ जैन आणि हिंदु मंदिरे पाडून बांधण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणाची याचिका वर्ष २०२१ मध्ये फेटाळली होती.

संपादकीय भूमिका

देशात मुसलमान आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्याच्या सहस्रो घटना आहेत. त्यांतील १ सहस्र ८०० घटनांची माहिती पू. सीताराम गोयल यांनीच पुस्तक रूपात प्रसिद्ध केली आहे. ही सर्व ठिकाणे हिंदूंना पुन्हा मिळण्यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन करावे लागेल !