सांगली येथील शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी त्वरित बंद करून शासनाचा ‘एस्.टी.पी.प्लांट’चा प्रकल्प मान्य करावा ! – नागरिक जागृती मंच

नागरिक जागृती मंचची मागणी

सांगली, १३ डिसेंबर (वार्ता.) – येथील कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी त्वरित बंद करून शासनाचा प्रलंबित असलेला ‘एस्.टी.पी.प्लांट’चा (सीवेज ट्रीटमेंट प्लाँट – सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) प्रकल्प तात्काळ मान्य करावा, अशी मागणी ‘नागरिक जागृती मंच’ आणि सांगली शहरातील नागरिक यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कृती केव्हा करणार ? – संपादक) नागरिक जागृती मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सद्यस्थितीतील कृष्णाच्या पात्रातील प्रदूषित पाण्याचे कॅन भरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली, मिरज अन् कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती ‘नागरिक जागृती मंचा’चे नेते श्री. सतीश साखळकर यांनी दिली. या वेळी मंचाचे कार्यकर्ते सर्वश्री उमेश देशमुख, महेश खराडे, संजय चव्हाण, मोहन चोरमुले, अविनाश जाधव, मयूर बांगर, अवधूत गवळी, गोपाळकृष्ण मर्दा, तसेच सांगली शहरातील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि आयुक्त यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार शेरीनाल्याचे पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे. त्यामुळे भेडसावत असलेला हा गंभीर आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

२. शेरीनाल्याच्या प्रश्नावर आजपर्यंत बर्‍याच निवडणुका लढल्या गेल्या, आश्वासने दिली गेली; परंतु आजपर्यंत हा प्रश्न पूर्णतः मुळापासून सोडवला गेला नाही. १ वर्षापूर्वी विधानसभेमध्ये कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय गाजला होता.

३. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेरीनाला ‘एस्.टी.पी.प्लांट’चा प्रस्ताव त्वरित पाठवावा. त्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

४. सदरहू ‘एस्.टी.पी.प्लांट’चा प्रस्ताव राज्यशासनाकडे गेली ७-८ महिन्यांपासून प्रलंबित आहे. याविषयी ‘नागरिक जागृती मंचा’च्या वतीने पत्रव्यवहारही झालेला आहे; परंतु अजूनही यातून काहीही ठोस निर्णय निष्पन्न झालेला दिसत नाही.

५. शेरीनाल्यावर उपसा करण्यासाठी सद्यपरिस्थितीत एकच मोटर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.