परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेल्‍या ६९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८४ वर्षे)

११.१२.२०२४ या दिवशी श्रीमती सुलभा मालखरेआजी यांचा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त साधिकेच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती सुलभा मालखरेआजी

१. शिकण्‍याची आवड

‘श्रीमती मालखरेआजी वयाच्‍या ४० व्‍या वर्षी दुचाकी गाडी चालवायला शिकल्‍या. त्‍या वयाच्‍या ५६ व्‍या वर्षी पोहायला शिकल्‍या.

२. त्‍या अनावश्‍यक बोलण्‍यात वेळ वाया घालवत नाहीत.  

३. स्‍वभाषाभिमान आणि धर्माभिमान

अ. साधकांच्‍या बोलण्‍यात एखादा इंग्रजी शब्‍द आल्‍यास आजी त्‍यांना लगेच जाणीव करून देतात.

आ. आजींमध्‍ये स्‍वधर्माभिमान रुजलेला आहे. इस्‍लाम धर्मातून हिंदु धर्मात परत आलेल्‍या एका तरुणीसंबंधीचा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये वाचल्‍यावर आजींनी तरुण मुलींमध्‍ये जागृती होण्‍यासाठी तत्‍परतेने ‘कथा एका प्रत्‍यावर्तनाची – मी इस्‍लाम का स्‍वीकारला व सनातन धर्मात का परतले ?’, लेखक – ओ. श्रुति (अनुवादक ए.आर्. नायर, जे.ए. थेरगांवरकर)’ या पुस्‍तकाच्‍या ४ प्रती मागवल्‍या आणि जिज्ञासूंना दिल्‍या.

सौ. मीना खळतकर

४. आयुर्वेदानुसार आचरण करणे

आजींना आयुर्वेदाविषयी पुष्‍कळ माहिती आहे. त्‍या विरुद्ध आहार, जसे की फळे आणि दूध एकत्र खात नाहीत. त्‍या आयुर्वेदानुसार आचरण करतात.

५. तळमळीने नामजप करणे

आजी तळमळीने नामजप करतात. त्‍यांना नामजप करतांना २ मिनिटे कुणाशी बोलावे लागले, तर त्‍या नंतर २ मिनिटे अधिक नामजप करतात. नामजप करतांना त्‍यांचे लक्ष मधून मधून विचलित झाल्‍याने ‘जप अल्‍प झाला असेल’, असे समजून त्‍या नंतर १० ते १५ मिनिटे अधिक वेळ नामजप करतात.

६. चुकांविषयी संवेदनशील

एकदा आजींच्‍या तोंडून अनावधानाने ईश्‍वराविषयी अयोग्‍य शब्‍द निघाला. तेव्‍हा त्‍यांनी एक घंटा क्षमायाचना केली.

७. संतांप्रती आदरभाव

त्‍या सांगतात, ‘‘संतांनी सांगितलेला जप प्रामाणिकपणे करायला हवा.’’

८. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव

अ. आजींना स्‍थुलातून सेवा करता येत नाही. त्‍या मानसरित्‍या गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) खोलीत जाऊन सेवा करतात, उदा. खोलीतील पटल पुसणे, जळमटे काढणे, गुरुदेवांचे पाय दाबणे, त्‍यांची कपबशी धुणे इत्‍यादी.

आ. आजींनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदेवांसाठी भावपूर्णरित्‍या मण्‍यांची माळ बनवली. त्‍या माळेकडे पाहून चांगले वाटत होते.

इ. त्‍या नेहमी म्‍हणतात, ‘‘गुरुमाऊलींनी माझ्‍यासाठी पुष्‍कळ केले आहे.’’

९. मालखरेआजींमध्‍ये जाणवलेले पालट 

अ. आजींमधील ‘क्षमाशीलता’ या गुणात वाढ झाली आहे.

आ. आजी आता इतरांचा विचार अधिक करतात.

‘आजी शीघ्रतेने संतपदी विराजमान होवोत’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’

–  सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.९.२०२४)