साधिकेला समष्टी सेवा करतांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट !
सौ. मनस्वी राऊत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. त्यांना आश्रमात सेवा करतांना प्रतिदिन सर्व साधकांच्या समवेत म्हणजेच समष्टीत रहाण्याची संधी मिळते. समष्टीत राहून सेवा केल्यावर सौ. मनस्वी यांना समष्टीकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि स्वतःत झालेले पालट येथे दिले आहेत.
१. पूर्वी समष्टीत सेवा करतांना असलेली मनाची स्थिती
‘पूर्वी साधक माझ्याशी बोलायला आल्यावर ते त्यांच्या प्रयत्नांविषयी किंवा सत्संगातील एखादे सूत्र मला सांगायचे. तेव्हा मी साधकांना केवळ प्रतिसाद द्यायचे; म्हणून त्यांचे बोलणे ऐकत असे.
२. समष्टीमध्ये स्वतःत जाणवलेले पालट
अ. मी काही साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे सांगत असतांना मलाही आनंद मिळायचा आणि ‘साधक त्यातून कसे शिकतात ?’, हे देव मला दाखवायचा.
आ. कुणी काही सूत्रे सांगत असतांना आता माझ्या मनात उत्सुकता निर्माण होते. ‘ते साधक मला आता काय सांगतील? त्यातून मला शिकायला काय मिळेल ?’, असा विचार येतो.
इ. ‘आता एखादा साधक माझ्याशी बोलतांना मला ‘मी स्वतःत काय पालट करायला हवा’, असे जाणवते. त्यामुळे ‘प्रयत्न कसे करायचे ?’, याविषयी मला दिशा मिळते.
ई. काही साधकांशी बोलतांना त्यांच्या ‘बोलण्याच्या पद्धती किंवा त्यांनी बोलतांना मला दिलेला प्रतिसाद’ या संदर्भात माझ्या मनात काही वेळेला पूर्वग्रह असायचा. त्यामुळे मला त्या साधकांशी ‘बोलणे टाळावे’, असे वाटायचे.
३. साधिकेने सर्वांशी बोलण्यासाठी केलेले प्रयत्न
अ. ‘मी कुणाशी बोलायचे टाळले, तर त्यातून माझी साधना होणार नाही’, याची माझ्या मनाला जाणीव झाली.
आ. तेव्हा देवानेच मला सुचवले, ‘नवीन साधक एकमेकांना भेटल्यावर जसे सहजतेने बोलतात, तसेच मी सर्वांशी बोलायला हवे.’
इ. साधक माझ्यसमोर आल्यावर ते नवीन आहेत, तर मी त्यांच्याशी कसे बोलले पाहिजे ?’, असा विचार येऊन माझ्याकडून तशी कृती होऊ लागली. मी आता सर्व साधकांशी बोलतांना सहजतेने बोलण्याचा प्रयत्न करते. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळतो.
ई. आता मला साधकांशी सहजतेने सेवेविषयी किंवा अन्य कुठल्याही विषयी बोलता येते. त्यामुळे मला सतत सकारात्मक रहाता येऊ लागले.
उ. समष्टीत राहून साधनेचे प्रयत्न चालू झाल्यानंतर साधकांशी बोलतांना माझी भावजागृती होते. त्यामुळे आता ‘भावजागृतीसाठी वेगळे प्रयत्न करायला हवेत’, असे मला वाटत नाही. गुरुकृपेने मी आता पुष्कळ आनंदी आहे.
४. समष्टीकडून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘माझ्या साधनेमध्ये वृद्धी व्हावी’, यासाठी माझ्यापेक्षा समष्टीची तळमळ अधिक असते.’
आ. ‘मी कुठे न्यून पडते ? मी काय केले पाहिजे ?’, याची जाणीव साधक मला वेळोवेळी करून देतात.
इ. साधकांच्या कृती आणि त्यांचे वागणे यांतून मला सतत शिकायला मिळते. त्यामुळेच ‘मी साधनेचे काही वेगळे प्रयत्न करते’, असे मला वाटत नाही.
ई. ‘सर्व साधकांच्या साहाय्यामुळे माझ्यामध्ये चांगले पालट होतात’, असे मला वाटते. माझी स्वतःला पालटण्याची तळमळ अल्प पडते; पण ‘समष्टी मला हाताला धरून पुढे घेऊन जात आहे’, याची मला भगवंत वेळोवेळी जाणीव करून देतो.
उ. ‘समष्टी म्हणजे प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत’, याची देवाने मला जाणीव करून दिली.
ऊ. ‘समष्टी का असते ?’, असा माझ्या मनाला प्रश्न पडायचा; परंतु आज मी जे प्रयत्न करत आहे, ते केवळ आणि केवळ या समष्टीमुळे !
५. भगवंत समष्टीच्या माध्यमातून मला घडवत असलेले पहातांना वेगळाच आनंद अनुभवता येणे
समष्टीमुळेच मी आज घडले आहे आणि घडत आहे. समष्टी माझ्या समवेत नसेल, तर मी कधी घडणारच नाही. भगवंत मला समष्टीच्या माध्यमातून कसा घडवतो, हे पहातांना मला एक वेगळाच आनंद अनुभवता येतो.
‘भगवान श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टर आपल्याच कृपेमुळे समष्टीच्या माध्यमातून मला शिकता आले’, त्याबद्दल आपल्या आणि संपूर्ण समष्टीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मनस्वी मेहूल राऊत (पूर्वाश्रमीची कु. कोमल पाटील), फोंडा, गोवा. (१६.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |