व्यायामामुळे पचन कसे सुधारते ?
निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३५
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’ (ergonomics) चे तत्त्व, आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत.
व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. ‘पचन चांगले होण्यासाठी व्यायामाचे साहाय्य कसे होते ?’, ते आपण या लेखात पाहूया.
(भाग २)
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/862475.html
६. व्यायाम करणार्या व्यक्तींमध्ये जळजळ-प्रतिबंधक जिवाणूंची (‘Roseburia’ आणि ‘Faecalibacterium’) पातळी अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहे.
७. ऊर्जा आणि पुनर्निर्मिती करणे : आतड्यांसाठी आवश्यक रसायने निर्माण करण्याच्या समवेत तेथील पेशींना आवश्यक ती ऊर्जा देण्याचे कार्यही हे सूक्ष्म जिवाणू करतात, तसेच त्या पेशींना इजा झाली असल्यास त्यांची पुनर्निर्मिती करण्याचे कार्यही होते.
८. संप्रेरकांची (Hormone) निर्मिती करणे
सूक्ष्म जिवाणूमुंळे आतड्यांतील पेशींत ‘PYY आणि GLP-1’ नावाचे संप्रेरक (Hormones) सिद्ध होतात. ही संप्रेरके मेंदूस वेगवेगळे संदेश पाठवतात. ज्यांचा परिणाम आपल्या मनाची स्थिती, शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती यांच्यावर होतो.
९. सूक्ष्म जिवाणू शरिरातील चयापचय (मेटाबॉलिझम) सुधारण्यास साहाय्य करत असणे
सूक्ष्म जिवाणू शरिरातील चयापचय सुधारण्यास साहाय्य करतात, उदा. ते निर्माण करत असलेले ‘प्रोपियोनेट’ नावाचे रसायन यकृतामध्ये (‘लिव्हर’मध्ये) साखर (ग्लुकोज) सिद्ध करणे, ‘प्रोटीन’ सिद्ध करणे आणि चरबी साठवणे यांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे एकूणच शारीरिक स्थिती सुधारते.
१०. आतड्यांतील रोगप्रतिकारक शक्ती वाढणे
सूक्ष्म जिवाणूंनी निर्माण केलेल्या रसायनांमुळे चांगल्या जिवाणूंसाठी (commensal bacteria) वातावरण योग्य रहाते आणि वाईट जिवाणूंच्या वाढीवर नियंत्रण रहाते. अशा प्रकारे आतड्यांतील रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. वर सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म जिवांचे अनेक प्रकार विविध कार्ये करतात. सूक्ष्म जिवांमध्ये विविधता असणे, हे निरोगीपणाचे लक्षण मानले जाते. नियमित शारीरिक हालचालींमुळे सूक्ष्म जिवांची विविधता वाढते आणि यांमुळे व्यक्ती निरोगी बनते.
११. पाचक रसांचे स्रवण वाढणे
व्यायामामुळे शरिराच्या गरजा वाढतात, उदा. घामावाटे पाणी बाहेर पडल्याने तहान अधिक लागते. नियंत्रित श्रम झाल्याने (झेपेल इतका व्यायाम केल्याने) भूक अधिक लागते. त्यामुळे आपोआपच शरिरात पाचक रसांचे स्रवण वाढून अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचते.
१२. अन्नाची गतीशीलता वाढणे
व्यायामामुळे अन्न पुढे ढकलले जाते. त्यामुळे त्याचे पचन चांगल्या प्रकारे होते. अन्नाच्या गतीला शैथिल्य आल्यास भूक मंदावणे, बद्धकोष्ठता होणे आणि अपचन होणे अशा तक्रारी उद़्भवतात.
अशा प्रकारे पचनाच्या संदर्भात व्यायामांचे होणारे विविधांगी लाभ लक्षात घेऊन प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (७.१२.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise