मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट !
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ डिसेंबर या दिवशी देहली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी देहली येथे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्या कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार हेही देहली येथे आहेत; मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात आहेत. याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा कोणताही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामानिमित्त देहली येथे आले आहेत. मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. एकनाथ शिंदे यांचे त्वरित काम नसल्यामुळे ते आले नाहीत.’’
देहली येथे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही सदिच्छा भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
महायुतीच्या मंत्रीपदाच्या वाटपाचा आराखडा निश्चित ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महायुतीमध्ये मंत्रीमंडळाचे वाटप कसे असेल, याविषयीही आमचा निर्णय झाला आहे. मंत्रीमंडळामध्ये भाजपच्या कोणत्या नेत्यांना विभागानुसार मंत्रीपद द्यायचे, त्याची सूची सिद्ध करण्यात आले आहे; मात्र ‘त्याचा अंतिम निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल’, असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्राला गतीशील ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य द्यायला सिद्ध आहेत.’’