UK Demand Ban Cousin Marriages : ब्रिटनमध्ये चुलत भावा-बहिणींमध्ये होणार्या विवाहांवर बंदी घाला !
ब्रिटनच्या संसदेत खासदार रिचर्ड होल्डन यांची मागणी
लंडन (ब्रिटन) : चुलत भाऊ-बहिणींच्या विवाहांतून जन्माला आलेल्या मुलांमध्ये आजार आणि अपंगत्व यांचा धोका लक्षणीय वाढला आहे. याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे चुलत भाऊ-बहिणींच्या विवाहांवर बंदी घालावी, अशी मागणी ब्रिटनमधील हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाचे खासदार रिचर्ड होल्डन यांनी संसदेत केली. ब्रिटनमध्ये भाऊ-बहीण यांच्या विवाहावर बंदी आहे; परंतु चुलत भाऊ-बहीण यांच्यातील विवाहाविषयी कोणताही कायदा नाही. होल्डन यांच्या प्रस्तावाला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला; मात्र सरकारच्या पाठिंब्याखेरीज हा कायदा करणे शक्य नाही.
My speech yesterday proposing to end first cousins marriage in the U.K.
For reason of:
1. Women’s rights & freedom
2. People’s health
3. Integration & societal cohesionI call on Sir @Keir_Starmer to lead Labour in backing my bill #BanFirstCousinMarriage pic.twitter.com/VyZdOuBo5C
— Richard Holden MP (@RicHolden) December 11, 2024
अशा विवाहांमुळे जन्माला आलेल्या मुलांना अनुवांशिक आजार होण्याचा धोका दुप्पट !
‘ऑक्सफर्ड जर्नल ऑफ लॉ अँड रिलिजन रिसर्च’चा हवाला देत खासदार रिचर्ड होल्डन म्हणाले की, ब्रिटनमधील काही स्थलांतरित समुदाय, जसे की ब्रिटीश-पाकिस्तानी आणि आयरिश प्रवासी यांच्यात चुलत भाऊ-बहिणींमध्ये विवाहाचे प्रमाण अधिक आहे. ब्रिटनमध्ये सुमारे ४० टक्के विवाह चुलत भाऊ-बहीणींमध्ये होतात. या विवाहांमुळे जन्माला आलेल्या मुलांना सामान्य मुलांच्या तुलनेत अनुवांशिक आजार होण्याचा धोका दुप्पट असतो. ही प्रथा महिलांच्या सुरक्षेसाठीही धोकादायक आहे. आधुनिक ब्रिटीश समाजासाठी ही प्रथा अजिबात योग्य नाही. देशासाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे; कारण आजी-आजोबांच्या काळाच्या तुलनेत परिस्थिती आता बिकट झाली आहे. त्याच वेळी गेल्या काही वर्षांत त्यात घटही होत आहे; कारण काही तरुण ही व्यवस्था स्वीकारत नाहीत. तरीही ती कायमची थांबवणे आवश्यक आहे. जगभरातील सुमारे १० टक्के विवाह चुलत भावांमध्ये होतात. आफ्रिकेतील सहारा प्रदेशात ३५ ते ४० टक्के बहिणी चुलत भावांशी विवाह करतात. हा प्रकार मध्य-पूर्व आणि दक्षिण आशिया येथे सामान्य आहे. पाकिस्तानच्या काही भागांत हे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोचले आहे.
भारतीय वंशाच्या मुसलमान खासदाराचा विरोध !
भारतीय वंशाचे ब्रिटीश खासदार इक्बाल महंमद संसदेत म्हणाले की, चुलत भावांसमवेतच्या विवाहांवर बंदी घालणे योग्य नाही. जनजागृतीतूनच हा प्रश्न सुटू शकतो. चुलत भावांमधील विवाह खूप सामान्य आहेत; कारण यामुळे कौटुंबिक संबंध निर्माण करण्यात आणि कौटुंबिक मालमत्ता सुरक्षित करण्यात साहाय्य होते.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माने या संदर्भात अधीच सांगितल्याने अशा प्रकारचे विवाह केले जात नाहीत. यातून हिंदु धर्म किती महान आहे, हे लक्षात येते ! |