परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘संगीतातून साधना’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
‘पुणे येथील आधुनिक वैद्या ज्योती काळे या एम्.डी.(भूलशास्त्र) असून त्या २५ वर्षांपासून भूलतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्या सध्या नवले रुग्णालय, नर्हे, पुणे येथे ‘सिनिअर कन्सल्टंट’ या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात बी.ए. केले आहे.
‘एकदा एका सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मी ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, याविषयी माझ्या मनातील काही शंका विचारल्या. त्या वेळी यांनी दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.
१. संगीताने आध्यात्मिक स्तरावर उपाय होतात आणि मनातील नकारात्मक विचार दूर होण्यासाठी स्वयंसूचना घ्याव्यात अन् संगीताचा सराव करावा !
आधुनिक वैद्या ज्योती काळे : भूतकाळातील गोष्टींविषयी मनात पुष्कळ नकारात्मक विचार येतात. स्वयंसूचना घेतल्यावर ते विचार काही काळ न्यून होतात; पण पुन्हा त्रास होतोच.
परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वयंसूचना घेऊन आपण आपल्या मनातील नकारात्मक विचार न्यून करतो; पण ती जागा आनंदाने भरून आली पाहिजे ना ! त्यासाठी तर संगीत आहे. ती तुमची आवडती सेवा आहे ना ! आणि त्यातून आध्यात्मिक स्तरावरील उपायही होतात.
२. गीत गातांना किंवा नृत्य करतांना काही जणांची समाधी लागते, म्हणजेच त्यातून साधना होत असल्याने संगीताचा सराव चालू ठेवावा !
आधुनिक वैद्या ज्योती काळे : मला जेव्हा त्रास होतो किंवा पुष्कळ थकवा येतो, तेव्हा मी एखादे भजन किंवा बंदीश (टीप) म्हणते. त्यामुळे मला बरे वाटते. मला वाटते, ‘ही माझी बहिर्मुखता तर नाही ना ? मी साधनेतील वेळ व्यर्थ तर घालवत नाही ना ?’
(टीप : बंदीश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात.)
परात्पर गुरु डॉ. आठवले : ज्या गोष्टींमुळे स्वतःवर आध्यात्मिक स्तरावर उपाय होतात, ती बहिर्मुखता कशी असेल ? आपण वाचले ना, केवळ गाण्यानेच नव्हे, तर नृत्य करतांनाही काही जणांची समाधी लागते. ‘हे कसे साध्य होईल ?’, असे आपल्याला वाटते; पण अशी पुष्कळ उदाहरणे आहेत. त्यामुळे संगीताचा सराव चालू ठेवावा.
३. संगीतातून साधना करणार्यांना नामजप करण्यापेक्षा गीत गाऊन, ऐकून किंवा वाद्यांचे सूर ऐकून त्वरित आनंद मिळतो !
आधुनिक वैद्या ज्योती काळे : मी ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ यासारखे भजन म्हटल्यावर मला ‘आपण माझ्या समवेत आहात’, असे जाणवून पुष्कळ बरे वाटते आणि आधारही वाटतो. माझे याविषयी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांच्याशी बोलणे झाले. त्या वेळी त्यांनी मला ‘‘भजन किंवा बंदीश म्हणण्यापूर्वीची मनाची स्थिती आणि त्या स्थितीत नंतर झालेला पालट यांची नोंद ठेवली, तर तो एक अनुभवसिद्ध अभ्यासच होईल’’, असे सांगितले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळे रागही आहेत ना, त्यांचाही वापर करून बघू शकतो. ‘संगीतातून साधना करणार्यांना नामजप करण्यापेक्षा संगीताने (गीत गाऊन, ऐकून किंवा वाद्यांचे सूर ऐकून) त्वरित आनंद मिळतो ! ’
– आधुनिक वैद्या (डॉ.) ज्योती काळे (बी.ए. संगीत), सिंहगड रोड, पुणे. (२.११.२०२४)
|