बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात कल्‍याण, प्रभादेवी (मुंबई), वर्धा येथे आंदोलन आणि मोर्चा !

प्रभादेवी येथील आंदोलनात उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठ

मुंबई – बांगलादेशामधील हिंदूंवर अन्‍याय आणि अत्‍याचार होत आहेत. तेथे हिंसाचाराच्‍या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्‍या आहेत. प्रभादेवी (मुंबई), कल्‍याण, वर्धा येथे आंदोलन करणे, मोर्चा काढणे यांद्वारे अत्‍याचारांचा निषेध करण्‍यात आला.

प्रभादेवी

मुंबईतील प्रभादेवी (पश्‍चिम) रेल्‍वेस्‍थानकाजवळ हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले. या वेळी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद आणि हिंदु जनजागृती समितीचे हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित होते.

‘हिंदूंनी भारत सरकारला बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या रक्षणाची जाणीव करून द्यायला हवी’, असे प्रतिपादन समितीचे श्री. प्रसाद मानकर यांनी या वेळी केले.

कल्‍याण 

कल्‍याण येथील आंदोलनात उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठ

येथील जनआक्रोश मोर्चात भाजपसह विश्‍व हिंदु परिषद, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, इस्‍कॉन, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, हिंदु जागरण मंच अशा विविध संस्‍था सहभागी झाल्‍या होत्‍या. या मोर्चाला सहस्रो हिंदूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चात आमदार सुलभा गायकवाड, जिल्‍हाध्‍यक्ष नाना सूर्यवंशी, कल्‍याण पूर्व मंडळ अध्‍यक्ष संजय मोरे, उपमहापौर मोरेश्‍वर भोईर, नगर संघचालक डॉ. उमेश कापुसकर, इस्‍कॉनचे महंत सारंगधरी दास, हिंदू सेवा संघ पूर्व संघचालक डॉ. विवेक मोडक, निशा सिंह, तसेच सर्व संस्‍थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्‍थित होते.

वर्धा येथे भव्‍य जनआक्रोश मोर्चा 

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने येथे भव्‍य जनआक्रोश मोर्चा काढण्‍यात आला. त्‍यात पू. सयाजी महाराज, पू. मुकेशनाथ महाराज, माजी खासदार रामदास तडस, भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाने, नागपूर येथील माजी महापौर दयाशंकर तिवारी, जिल्‍हा संघचालक जेठानंद राजपूत, कमल कुलधरिया, ‘इस्‍कॉन’ परिवार यांच्‍यासह जिल्‍ह्यातील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि सहस्रो नागरिक मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

प्रारंभी येथील सर्कस मैदानावर सभा घेण्‍यात आली. नंतर दुपारी ३ वाजता जनआक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला. शिष्‍टमंडळाने माननीय राष्‍ट्रपती आणि पंतप्रधान यांच्‍या नावे प्रभारी जिल्‍हाधिकार्‍यांना मागण्‍यांचे निवेदन सादर केले.

क्षणचित्रे 

१. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचाराच्‍या विरोधात येथील व्‍यापार्‍यांनी सर्व लहान मोठी प्रतिष्‍ठाने उत्‍स्‍फूर्तपणे बंद ठेवली होती.

२. मोर्चामध्‍ये ‘इस्‍कॉन’च्‍या वतीने ‘हरे रामा हरे कृष्‍णा, कृष्‍णा कृष्‍णा हरे हरे’ असे नामसंकीर्तन करण्‍यात आले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या संदर्भात  हिंदूंनी केलेल्‍या मागण्‍या भारत सरकार कधी पूर्ण करणार आहे ?