कळवळून हाक माराल, तेव्हा मी (गुरु अथवा देव) उपस्थित आहे !
श्री. गणपतराव करंदीकर यांनी सांगितलेली हकीगत अशी, ‘वर्ष १९०४ मध्ये श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) गोंदवल्याहून काशी यात्रेस गेले. त्या वेळी ‘माझ्या समवेत येणे जमत असल्यास काशी यात्रेस यावे’, असे महाराजांचे पत्र माझ्या वडिलांना आले. काही प्रापंचिक अडचणीमुळे माझ्या वडिलांना महाराजांच्या समवेत काशी यात्रेस जाणे जमले नाही. दीड वर्षानंतर आम्ही सर्व गोंदवले येथे गेलो. आपल्याला काशी यात्रेस येता आले नाही, याविषयी माझ्या वडिलांनी श्रीमहाराजांकडे दिलगिरी (क्षमा) व्यक्त केली. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही काशी आणि हरिद्वार येथील यात्रेला जाल, त्या वेळी मी तुमच्या समवेतच आहे, असे समजावे. मला हाक मारल्यास मी तुमच्याजवळ नक्कीच उपस्थित होईन.’
वर्ष १९१३ मध्ये महाराजांनी समाधी घेतली. त्यानंतर मी, आई, वडील आणि धाकटा भाऊ असे सगळे काशी आणि हरिद्वार येथे गेलो. हरिद्वारला वडील, आई आणि मी गंगेमध्ये स्नानास उतरलो. धाकटा भाऊ लहान म्हणून काठावरच उभा राहिला. स्नान करता करता आम्ही जराशा खोल पाण्यात गेलो. तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि आम्ही आणखी खोल पाण्यात ढकलले गेलो. वडिलांच्या कमरेला धोतर घट्ट बांधलेले होते, त्याचा आधार आईने घेतला आणि मी आईच्या कमरेला बिलगलो. आम्ही आता नक्की बुडणार, अशी आमची जवळजवळ खात्री झाली. त्याच क्षणी वडिलांनी ‘श्रीमहाराज’ अशी जोराने हाक मारली. त्या क्षणी एक दख्खनचा बैरागी पाण्यात आला. त्याने उजव्या हाताने माझ्या वडिलांची मान धरली, डाव्या हाताने माझ्या आईला धरले आणि आम्हा तिघांना काठावर आणून सोडले. हे सारे होईपर्यंत किनार्यावरील लोकांमध्ये आरडाओरड चालू झाली. ‘दख्खनच्या एका बैराग्याने तिघांना वाचवले’, असे सर्व बोलू लागले. तो बैरागी किनार्यावर येताक्षणी गर्दीत शिरला आणि नाहीसा झाला. माझ्या वडिलांनी त्याला शोधण्याचा बराच प्रयत्न केला; परंतु तो व्यर्थ ठरला.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)