‘परभणी बंद’ला हिंसक वळण : ७ ठिकाणी जाळपोळ, तोडफोड !
|
परभणी – शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणार्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची काच एका मनोरुग्णाने ९ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फोडली. त्यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष या मनोरुग्णाला अमानुष मारहाण केली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
या विटंबनेचा निषेध म्हणून ११ डिसेंबर या दिवशी परभणी आणि गंगाखेड गावांत बंद पुकारण्यात आला; मात्र या बंदला हिंसक वळण लागले. परभणी शहरात ७ ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली, तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या; मात्र जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी संचारबंदी लागू करून इंटरनेट सेवा बंद केली आहे. अद्याप कुणावरही गुन्हा नोंद झाला नाही.
१. आरोपीचे नाव सोपान दत्तराव पवार (वय ४५ वर्षे) असे आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. राज्यघटनेच्या प्रतिकृतीवरील काच फुटल्यानंतर कपड्याने ही प्रतिकृती झाकून ठेवण्यात आली असून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
२. शहरात अनेक ठिकाणी फलकांची तोडफोड करून ते रस्त्यावर पेटवून देण्यात आले. अग्नीशमनदलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पोलिसांकडून रस्त्यावर संचलन करण्यात येत आहे. बंदच्या वेळी अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. महिला आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; परंतु महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले. कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी घोषणा दिल्या.
३. परभणी बंद असतांना शहरात चालू असलेली दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते; परंतु या आदेशाला न जुमानता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलीस आणि प्रशासन यांनी तात्काळ कारवाई न केल्याने परिस्थिती चिघळली ! – विजय वडेट्टीवार, नेते, काँग्रेस
सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस यांनी तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती; मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी विटंबना करणार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. राज्यघटनाप्रेमी जनतेनेही शांतता आणि संयम बाळगावा अन् प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
आमदार आणि खासदार यांच्या प्रतिक्रिया…
अराजक घटकांवर कारवाई केली जाईल ! – प्रवीण दरेकर, भाजप नेते
परभणी येथे घडलेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच राज्यघटनेचा आदर केला आहे. राज्यघटनेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार्या अराजक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
या विषयी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राहुल पाटील म्हणाले की, आंदोलकांनी शांत रहावे. परिस्थिती नियंत्रणात आहे. कुणीही घाबरून जाऊ नका. ९ डिसेंबर या दिवशी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. निषेध नोंदवतांना इतरांना काही त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारने तातडीने या समाजकंटकांवर कारवाई करून समाजात अशांतता निर्माण करणार्या प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.
१० डिसेंबर या दिवशी घडलेल्या घटना
१. संतप्त जमावाने जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वेस्थानक परिसरात ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते.
२. काही हुल्लडबाजांनी गांधी पार्ककडे जाणार्या रस्त्यावर, आयटीआय परिसरातील दुकानांवर दगडफेक केली. रस्त्यावर उभ्या वाहनांचीही हानी केली. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण केले.
३. आंदोलकांनी रेल्वेस्थानकावर आलेली नंदीग्राम एक्सप्रेस थांबवून संताप व्यक्त केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे पुढे मार्गस्थ झाली.
४. राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याची बातमी काही वेळातच सामाजिक माध्यमांद्वारे परभणी जिल्ह्यात पोचली. तिचे पडसाद जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी आणि सेलू या तालुक्यांतही उमटले. पोलिसांनी शहरांसह जिल्ह्यात अतिरिक्त कर्मचारी तैनात करून बंदोबस्त वाढवला आहे.
आंदोलक आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक !
परभणी येथील आंदोलक आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी परभणी शहर अन् जिल्हा यांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तरुण बांधवांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे. अफवांवर विश्वास ठेवून कुठलेही गैरकृत्य करू नये. कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले.
आरोपींना २४ घंट्यांत अटक करा, अन्यथा परिणामास सिद्ध रहा ! – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष
परभणी येथील राज्यघटनेच्या प्रतिकृतीच्या विटंबनेतील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. प्रस्तुत घटनेतील समाजकंटकांना २४ घंट्यांत अटक करा, अन्यथा परिणामास सिद्ध रहा, अशी चेतावणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ११ डिसेंबर या दिवशी दिली.