श्रीकृष्णाने सांगितलेली विश्वकल्याणकारी श्रीमद़्भगवद़्गीता, प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनातून सांगितलेले श्रीमद़्भगवद़्गीतेचे सार आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी सांगितलेली भगवद़्गीता, म्हणजे ‘गुरुकृपायोग’ !
११ डिसेंबर या दिवशी झालेल्या गीता जयंतीच्या निमित्ताने…
‘भगवान श्रीकृष्णाने सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतला. त्याने मानवाच्या कल्याणासाठी भगवद़्गीता (१८ अध्याय, ७०० श्लोक) सांगून मानवजातीला जीवन यशस्वीरित्या जगण्याचा मार्ग दाखवला. ‘अशा भगवद़्गीतेचे वाचन करावे आणि त्यातील काही भाग आचरणात आणावा’, असे मला लहानपणापासून वाटत होते; मात्र मला संस्कृतभाषा न येणे, गीतेतील श्लोकांची व्याप्ती पुष्कळ असणे, त्याचा भावार्थ न समजणे आणि गीतेतील सूत्रे आचरणात आणता न येणे आदी गोष्टींमुळे ‘भगवद़्गीता’ हा हिंदूंचा अनमोल धर्मग्रंथ असूनही मी त्यापासून वंचित राहिलो होतो.
१. श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद़्गीता आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितलेले भगवद़्गीतेचे सार !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा वर्ष १९९१ ते १९९५ या कालावधीत सत्संग लाभला. तेव्हा प.पू. बाबांनी सांगितलेले गीतेचे सार मला शिकायला मिळाले.
१ अ. ‘भगवद़्प्राप्ती आणि गुणातीत पुरुषाचे लक्षण’ यांविषयी भगवद़्गीतेत सांगितले असणे : भगवद़्गीतेत ‘प्रकृती-पुरुष यांंपासून जगाची उत्पत्ती होणे, तसेच सत्त्व, रज आणि तम हे गुण’ यांचे वर्णन दिले आहे. ‘भगवद़्प्राप्ती आणि गुणातीत पुरुषाचे लक्षण’ यांविषयी भगवद़्गीतेच्या गुणत्रयविभागयोग, १४ व्या अध्यायात सांगितले आहे.
१ आ. प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेल्या भजनापूर्वी म्हटल्या जाणार्या प्रार्थनेत सद़्गुरूंची भावातीत स्थिती वर्णिली असणे
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् (टीप १) ।
एकं नित्यं विमलमचलं (टीप २) सर्वधीसाक्षीभूतं (टीप ३)
भावातीतं (टीप ४) त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥
अर्थ : ब्रह्मरूप, आनंदरूप, परमोच्च सुख देणारे, केवळ ज्ञानस्वरूप, द्वन्द्वरहित, आकाशाप्रमाणे (निराकार), ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे लक्ष्य (ते तू आहेस, असे वेदवाक्य ज्याला उद्देशून आहे ते), एकच एक, नित्य, शुद्ध, स्थिर, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भावातीत, गुणातीत असलेल्या अशा सद़्गुरूंना मी नमस्कार करतो.
टीप १ – केवळ ब्रह्माकडे लक्ष असलेला किंवा ब्रह्माशी एकरूप झालेला.
टीप २ – निर्मळ आणि ब्रह्माप्रमाणे स्थिर
टीप ३ – साक्षीभावाने पहाणारा
टीप ४ – भावाच्या पलीकडे गेलेला, म्हणजे मनोलय झालेला
१ इ. प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितलेले भगवद़्गीतेचे सार
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ – श्रीमद़्भगवद़्गीता श्लोक १८ अध्याय ६६॥
अर्थ : सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तीमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. ॥ १८-६६ ॥
विश्लेषण : सर्वधर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ परमेश्वराला शरण जा. लज्जा, भय, मान, मोठेपणा आणि आसक्ती हे सर्व सोडून, म्हणजेच सांसारिक अहंता, ममता यांचा त्याग करून केवळ एका परमेश्वरालाच परम आश्रय, परम गती, सर्वस्व समजणे, तसेच अनन्य भावाने अतिशय श्रद्धायुक्त भावाने त्याचे चिंतन करत रहाणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे, म्हणजे परमात्म्याला शरण जाणे होय.
१ ई. श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवन संग्रामाविषयी सांगणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘जीवन हा संग्राम ।’ या भजनातून शिकवणे : श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जीवन हा संग्राम असून त्यातून बाहेर पडून जीवन सार्थकी कसे लावायचे ?’, यांविषयी गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘जीवन हा संग्राम ।’ या त्यांच्या भजनातून समाजाला शिकवले. त्या भजनातील काही पंक्ती येथे दिल्या आहेत.
मानवा जीवन हा संग्राम ।
बांधवा करी भक्ती निष्काम ।
अवघे संघर्षाचे धाम । मानवा ॥ धृ. ॥
ज्ञानी म्हणूनी तू जगी मिरविसी ।
इतर जनांसी सावध करिसी ।
स्वतः आपणा कसा फसविसी ।
आहे का हृदयी तुझ्या हरिनाम । मानवा ॥ ७ ॥
आतातरी तू सावध हो रे ।
कर्तेपण तू मला अर्पी रे ।
मीपणात तू मज आठवी रे ।
खचित मी करीन तुला निष्काम । मानवा ॥ ८॥
१ उ. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘गीतेत सांगितलेली भक्ती नामस्मरणाच्या माध्यमातून कशी करायची ?’, याविषयी सांगणे : एकदा भगवद़्गीतेसंबंधी जळगाव येथे एक सभा होती. सभेच्या आयोजकांनी प.पू. भक्तराज महाराज यांना बोलण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला भाषण किंवा प्रवचन करता येत नाही; पण भजन म्हणू शकतो.’’ तेव्हा प.पू. भक्तराज महाराज यांनी पुढील भजन म्हटले, जे सर्वांना पुष्कळ आवडले. त्यांनी भजनाच्या माध्यमातून गीतेचे पूर्ण सार सांगून भक्तांना ‘गीतेत सांगितलेली भक्ती नामस्मरणाच्या माध्यमातून कशी करायची ?’, याविषयी सांगितले. त्या भजनातील काही पंक्ती येथे दिल्या आहेत.
रटा कर रटा कर तू हरि ॐ तत्सत् ।
गीता का महामंत्र हरि ॐ तत्सत् ।
जीवन का जो सार हरि ॐ तत्सत् ।
जपा कर जपा कर तू हरि ॐ तत्सत् ॥ धृ ॥
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांकडून भगवद़्गीतेत सांगितल्यानुसार ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गानुसार साधना करून घेणे
२ अ. ‘गीतेतील श्लोक आणि ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गात सांगितलेली अष्टांग साधनेची सूत्रे’ यांचा जवळचा संबंध असणे : वर्ष १९८९ मध्ये माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. ते घेत असलेले ‘सत्संग, अभ्यासवर्ग आणि प्रवचने’ यांतून मला ‘अध्यात्म, साधना अन् सेवा’ यांविषयी ज्ञान मिळू लागले. त्यामुळे ‘गीतेत सांगितलेले कसे साध्य करायचे ?’, हे माझ्या लक्षात येऊ लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला पात्र बनवून आमच्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेऊ लागले. त्यांनी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गानुसार माझ्याकडून साधना आणि सेवा करून घेतली अन् माझ्या जीवनात आनंद भरला. तेव्हा ‘श्रीकृष्णाने सांगितलेली गीता मी थोडीफार आचरणात आणत आहे’, असे मला वाटू लागले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सध्याच्या काळातील भगवद़्गीताच आहे’, याची मला जाणीव होते. ‘गीतेतील श्लोक आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांत सांगितलेली अष्टांग साधनेची सूत्रे’ यांचा जवळचा संबंध आहे’, हे माझ्या लक्षात आले.
२ आ. जीवन जगत असतांना पावलोपावली मन संभ्रमित होत असणे आणि ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्यावर मन कणखर होऊन जीवन आनंदाने जगता येणे : गीतेच्या पहिल्याच अध्यायात सांगितल्याप्रमाणे जेव्हा अर्जुन गर्भगळीत होतो, तेव्हा श्रीकृष्ण त्याला विविध योग सांगून अन् उदाहरणे देऊन उपदेश करतो. माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात ‘हे करू का ? ते करू ? काय करू आणि कसे करू ? संकल्प-विकल्प, विचार-अविचार’, असे चक्र सतत चालू असते. आपले मन म्हणजे युद्धभूमी होते. आपल्यामध्ये असलेला ‘मीपणा, भावनाशीलता, भीती’ इत्यादी स्वभावदोषांमुळे आपण गर्भगळीत होतो. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगून ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणवृद्धी करणे’ यांसाठी पद्धती (सुविधा) निर्माण केल्या आहेत. सनातनच्या साधकांकडून ही प्रक्रिया राबवली जाते. परिणामी साधक साधना आणि सेवा करण्यासाठी अन् आनंदी जीवन जगण्यासाठी सिद्ध होतात.
२ इ. गुरुचरणी शरण जाऊन शरणागतभावाने साधना केल्यावर साधकांची प्रगती होणे : गीतेच्या १८ व्या अध्यायातील ६६ व्या श्लोकात म्हटले आहे, सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥, ते समजून साधक शरणागती पत्करतो. साधना करतांना साधकाला अनंत अडचणी येतात. त्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये चढ-उतार होतात. त्याला शेवटी ज्ञान होते की, ‘गुरुकृपेविना स्वतःच्या बळावर काही करू शकत नाही.’ परिणामी साधक सर्वस्वाचा त्याग करून (समर्पित होऊन) गुरुचरणी शरण जाऊन गुरु सांगतील ती साधना करण्यास सिद्ध होतो. गुरुकृपेमुळेच साधकाचा साधना करून मोक्षापर्यंतचा प्रवास सहजतेने होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना करून आतापर्यंत सनातनच्या १३१ साधकांनी संतपद गाठले आहे आणि शेकडो साधक संतपदाकडे वाटचाल करत आहेत.
३. कृतज्ञता
‘भगवद़्गीतेचा अभ्यास करणे म्हणजे पुष्कळ अवघड आणि अशक्य आहे’, असे मला वाटत होते. हे लिखाण करतांना ‘सनातनचे साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुकृपेने गीता आचरणात आणत आहेत’, असे मला जाणवते आणि म्हणावेसे वाटते,
धर्मग्रंथ गीता प्रगटली श्रीकृष्णाच्या मुखातूनी ।
नतमस्तक होऊया परमानंद जगद़्गुरु श्रीकृष्णाच्या चरणी ॥ १ ॥
धर्मग्रंथ गीता सांगितली भजनांतून प.पू. भक्तराज महाराज यांनी ।
त्रिवार वंदन असे अनंत कोटी ब्रह्मांडनायक गुरूंच्या चरणी ॥ २ ॥
धर्मग्रंथ गीतेनुसार साधना करून घेतली ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गातूनी ।
कृतज्ञताभावात राहूया, अशा सच्चिदानंद गुरुदेवांच्या चरणी (टीप) ॥ ३ ॥
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विश्वकल्याणकारी भगवद़्गीता सांगणारे आणि साधना करून घेणारे भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल, (५.१२.२०२४)
देह, मन आणि बुद्धी यांद्वारे प्रारब्ध भोगत असतांना नामस्मरण आणि साधना करा ! – प.पू. भक्तराज महाराज |