पुणे शहरातील २ लाख २० सहस्रांहून अधिक मिळकतींची ४० टक्के करसवलत रहित !
आता १०० टक्के वसुली होणार
पुणे – ४० टक्के मिळकतकराची सवलत देण्यासाठी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणांतून २ लाख २० सहस्र ६१६ मिळकतींची ४० टक्क्यांची सवलत काढून घेण्यात आली. घरामध्ये भाडेकरू ठेवले आहेत किंवा ज्यांची एकाहून अधिक घरे आहेत, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. येणार्या २०२४-२५ च्या मिळकतकराच्या देयकांतून १०० टक्के करवसुली केली जाणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून समजते. महापालिकेने वर्ष १९७० पासून एका निवासी मिळकतीवर ४० टक्के कर सवलत देण्यास प्रारंभ केला होता. राज्य सरकारने लेखापरीक्षणामध्ये या सवलतींवर आक्षेप घेत सवलत बंद करण्याचे आदेश दिले होते. (ही सवलत का चालू केली ? यामुळे महापालिकेच्या झालेल्या हानीची भरपाई कुणाकडून करणार ? – संपादक) त्यामुळे वर्ष २०१९ नंतर ४ लाख ६४ सहस्र २२२ निवासी मिळकतींची १०० टक्के करवसुली चालू केली. त्यामध्ये वर्ष २०१९ नंतर खरेदी केलेल्या सदनिकांचाही समावेश होता. या विरोधात पुणेकरांनी तक्रारी करत नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या दबावामुळे राज्य सरकारने नमते घेत ४० टक्के सवलत पुन्हा प्रारंभ करण्यास सांगितले.
मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष जागेवर जाऊन कर्मचार्यांनी पडताळणी केली असता २ लाख २० सहस्र ६१६ घरांमध्ये घरमालकांच्या ऐवजी भाडेकरू रहात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची सवलत काढून घेतली.’’