इचलकरंजी (कोल्‍हापूर) येथे जप्‍तीची कारवाई टाळण्‍यासाठी लाच घेतांना कायदेशीर सल्लागारास अटक !

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – येथील एका व्‍यावसायिकाने इंडियन बँकेच्‍या इचलकरंजी येथील शाखेतून साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. थकीत कर्जापोटी बँकेने व्‍यावसायिकास नोटीस पाठवली होती. घरात मंगलकार्य असल्‍याने ही कारवाई पुढे ढकलण्‍याची विनंती व्‍यावसायिकांनी बँकेचे कायदेशीर सल्लागार अधिवक्‍ता विजय पाटणकर यांच्‍याकडे केली होती. यावर ही जप्‍ती पुढे ढकलण्‍यासाठी अधिवक्‍ता पाटणकर यांनी अडीच लाख रुपयांची मागणी केली. अखेर १ लाख ८० सहस्र रुपयांवर तडजोड झाली. याविषयी सदरच्‍या व्‍यावसायिकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. राष्‍ट्रीयीकृत बँकेच्‍या विरोधात तक्रार असल्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती पुण्‍याच्‍या केंद्रीय अन्‍वेषण विभागाच्‍या अधिकार्‍यांना दिली. तक्रारीची पडताळणी करून दोन्‍ही विभागांनी संयुक्‍त कारवाई करत अधिवक्‍ता पाटणकर यांना अटक केली.

बँकेच्‍या कायदा सल्लागारावर कारवाई होण्‍याचा हा पहिलाच प्रकार असून लाचखोरीविषयी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून (सीबीआयकडून) झालेली ही जिल्‍ह्यातील पहिलीच कारवाई आहे, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्‍या अधिकार्‍यांनी दिली.

संपादकीय भूमिका

लोकहो, लाच मागणार्‍यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करून भ्रष्‍टाचाराला आळा घाला !