भक्तीयोग जाणून घेतांना…
‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्यास अत्यंत कठीण आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्तीयोगा’चे माहात्म्य सांगून सर्वसामान्य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. ज्ञानाचा विचार केला, तर ज्ञानप्राप्तीसाठी बुद्धीवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग हा खडतर आणि अशक्य ठरतो. ११ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कर्मयोग आणि भक्तीयोग यांतील भेद, भक्तीमार्गाविषयी आद्यशंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांचे उद़्गार अन् जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या दृष्टीने भक्तीभाव’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/862316.html
४. समर्थ रामदासस्वामी यांना भक्तीभावामुळे विठ्ठलात रामाचे दर्शन होणे
समर्थ रामदासस्वामी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गेले. त्यांना सर्वत्र राम दिसत होता. विठ्ठलाचे दर्शन घेतांना त्यांना विठ्ठलातच राम दिसला आणि ते विठ्ठलाला विचारू लागले….
येथे का रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघशामा ॥
काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥
काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥
रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥
हे दाखले आपण लक्षात घेतले, म्हणजे ‘सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।’ (भावार्थ : कुठल्याही देवाला नमस्कार केल्यास अंततः तो भगवान श्रीकृष्णालाच पोचतो.)
५. भक्त, भक्ती आणि साधनामार्ग यांविषयीचे विवरण
भक्ती करणार्याच्या ठायी केवळ श्रद्धाभाव असावा, एवढीच अट आहे, म्हणजेच भक्तीमार्गात ज्ञानाचे काम श्रद्धा करते. प्रेम किंवा भक्ती कुणावर करावी, हे श्रद्धेला कळत नाही; पण बुद्धीला कळते. बुद्धी अतिशय तीव्र नसली, तरी श्रद्धा कुठे ठेवावी, हे कळण्याइतकी ती समर्थ असली पाहिजे. वेडी श्रद्धा आणि वेडे प्रेम हे फलदायी ठरत नाही. या गोष्टीकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.
भक्तीमार्गावरून वाटचाल करणारा ईश्वराचा भक्त हा त्याच मार्गावरून सातत्याने वाटचाल करू लागला की, पुढच्या नाही, तर त्याच्या पुढच्या अनेक जन्मानंतर कधी ना कधी कोणत्या तरी एका जन्मात ‘वासुदेव सर्वस्व आहे’, असे जाणवते आणि त्याला परमेश्वराच्या स्वरूपाचे खरे ज्ञान प्राप्त होते. असे खरे ज्ञान त्याला प्राप्त झाले की, मुक्ती मिळते. असे सांगून भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की, असा महात्मा दुर्लभ आहे.
हेच भगवान श्रीकृष्णाने गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे.
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥
– श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ६, श्लोक ४५
अर्थ : परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो.
हा नियम केवळ योगमार्गावरून वाटचाल करणार्यांसाठी नसून तो कर्मयोग, संन्यासयोग, भक्तीयोग अशा कोणत्याही मार्गावरून वाटचाल करणार्या सर्वांसाठी आहे. भक्ताच्या मनात देवावरील श्रद्धा दृढ करण्याचे काम स्वतः भगवंत करतो.
(क्रमशः)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (९.१२.२०२४)