B’desh U-TURN Accepts Attacks On HINDUS : बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवरील आक्रमणाच्या ८८ घटना घडल्या !

बांगलादेशातील अंतरिम सरकारची अंततः स्वीकृती !

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि महंमद युनूस यांचे प्रसारमाध्यम सचिव शफीकुल आलम

ढाका (बांगलादेश) : शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर, विशेषतः हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या ८८ घटना घडल्याची स्वीकृती बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या समवेत बैठक घेऊन अल्पसंख्यांकांवर होणार्‍या आक्रमणांचे सूत्र उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. यानंतर बांगलादेश सरकारने वरील स्वीकृती दिली.

सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे प्रसारमाध्यम सचिव शफीकुल आलम यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत अल्पसंख्यांकांशी संबंधित घटनांमध्ये एकूण ८८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या घटनांच्या संदर्भात ७० जणांना अटक करण्यात आली आहे. ईशान्य सुनामगंज, मध्य गाझीपूर आणि इतर भागांतूनही हिंसाचाराच्या नवीन घटना घडल्या आहेत, त्यामुळे प्रकरणे आणि अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पीडितांपैकी काही जण आधीच्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य असल्याची प्रकरणेही असू शकतात. २२ ऑक्टोबरनंतर घडलेल्या घटनांचा तपशील लवकरच प्रसारित केला जाईल.

संपादकीय भूमिका

  • केवळ स्वीकृती देऊन चालणार नाही, तर यापुढे एकाही हिंदूवर आक्रमण होणार नाही, अशा प्रकारे हिंदूंना संरक्षण देऊन पीडितांना हानीभरपाईही दिली गेली पाहिजे ! यासाठी भारताने दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
  • ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये बांगलादेशात हिंदूंवर सहस्रो आक्रमणे झाली असतांना तेथील सरकारने घोषित केलेली हिंदूंवरील आक्रमणांची आकडेवारी अत्यंत अल्प आहे. ‘आम्ही हिंदूंसाठी काही तरी करत आहोत’, हे दाखवण्यासाठी बांगलादेशाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे !