Bulldozer Action Fatehpur Masjid : फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील १८५ वर्षे जुन्या मशिदीचे अतिक्रमण प्रशासनाने पाडले !

फतेहपूरच्या नूरी मशिदीवर बुलडोझर कारवाई

फतेहपूर (उत्तरप्रदेश) : येथील १८५ वर्षे जुन्या नूरी मशिदीचे अतिक्रमण १० डिसेंबर या दिवशी पाडण्यात आले. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ही कारवाई करण्यात आली. सकाळी ८ वाजता चालू झालेली कारवाई दुपारी ३ वाजेपर्यंत चालू होती. या वेळी घटनास्थळी पोलीस उप अधीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त होता. तसेच धडक कृती दलाचे पथकही तैनात करण्यात आले होते.

१. ही मशीद १८५ वर्षे जुनी असली, तरी ३ वर्षांपूर्वी मशिदीच्या इमारतीमध्ये काही बांधकाम करण्यात आले. ते अवैध होते. यामुळे राज्यातील बांदा-बहराईच रस्ता रुंदीकरणाला अडथळा येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

२. मशिदीच्या समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याचवर्षी १७ ऑगस्टला अतिक्रमण १ मासामध्ये स्वतःहून पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती; मात्र तिने अतिक्रमण पाडले नाही.

३. त्याऐवजी मशीद समिती उच्च न्यायालयात गेली. यावर सुनावणी होणार आहे; मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने स्वतःहून कारवाई करत अतिक्रमण पाडले.

संपादकीय भूमिका

अतिक्रमणाच्या विरोधात कठोर कारवाई करणार्‍या उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून अन्यत्रचे शासनकर्ते काही शिकतील का ?