अतिरिक्‍त ‘प्रोटीन’ मिळवण्‍यासाठी प्रयत्न करत आहात, सावधान !

दिवसाचे ‘प्रोटीन’ (प्रथिने) पूर्ण करण्‍याची चढाओढ ‘जिम’ला (आधुनिक व्‍यायामशाळेत) जाणार्‍या बर्‍याच लोकांमध्‍ये दिसते. यामध्‍ये तिथे असणार्‍या प्रशिक्षकाने सांगितलेले विविध आहार हे त्‍यांच्‍या शिक्षणाची खातरजमा न करता ‘स्‍ट्रेंथ ट्रेनिंग’मध्‍ये (स्नायूंना बळकटी आणण्‍यासाठीचे प्रशिक्षण) घालवलेले स्नायू परत मिळवण्‍यासाठी आणि मग अजून वाढण्‍यासाठी चालू केला जातो. ‘थायरॉईड’ची पातळी बिनसलेल्‍या रुग्‍णांना पाव किलो पनीर आणि ८ अंडी प्रतिदिन खायला सांगितले जाते. त्‍यामुळे त्‍याविषयीचा चाचणी अहवाल तेवढ्यापुरता योग्‍य आला, तरी तो आहार घेण्‍यातील सलगता, त्‍याचे अवयवांवर होणारे परिणाम, शरिरात दिसणारे अम्‍लप्रधान पालट आणि त्‍याचे हाडांवर होणारे दुष्‍परिणाम यांचा विचार करायला हवा. कुठलाही आहार चालू करतांना त्‍यातील शाश्‍वतता ही महत्त्वाची आहे. आयुर्वेदात याचा पुुष्‍कळ सखोल विचार केला जातो आणि त्‍यामुळेच ती विशिष्‍ट आहार चौकट लांबपर्यंत समाविष्‍ट करता येते.

प्रतीकात्मक छायाचित्र

१. अतिरिक्‍त ‘प्रोटीन’मुळे दुष्‍परिणाम होण्‍याची शक्‍यता

भारतासारख्‍या उष्‍ण कटिबंधी देशात ‘प्रोटीन’ पचवायला वातानुकूलित खोलीमध्‍ये व्‍यायाम करणे आणि मग तो व्‍यायाम अंगी लागायला परत ‘प्रोटीन’ खात रहाणे, यात आपले ऋतू अन् गरम हवामान यांमुळे असलेला अग्‍नीवरील परिणाम यांचा विचार केलाच जात नाही. इतके ग्रॅम चिकन, इतकी अंडी, इतके चमचे ‘प्रोटीन पावडर’ यातून साध्‍य झालेल्‍या अधिकच्‍या स्नायू संहननातून आरोग्‍य मिळते कि नाही ? हा मोठाच प्रश्‍न आहे.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

पाळीच्‍या तक्रारी असणार्‍या मुलींना अशा पद्धतीत दिलेला आहार बंद करून आयुर्वेद औषधोपचार केले असता त्‍यांच्‍या याविषयीच्‍या तक्रारी पटकन न्‍यून होतात. मुळात प्रमाणाबाहेर वाढत गेलेले ‘मसल’ (स्नायू) मास हे ‘अंड्रोजेन’ (विशिष्‍ट प्रकारचे संप्रेरक) वाढवते, जे त्‍या आजारात आधीच वाढलेले असण्‍याची शक्‍यता असते. अशा परिस्‍थितीत ‘हार्मोन’ (संप्रेरके) आणि प्रतिजैविके) यांनी दूषित असलेले मांस, अंडी अन् भेसळयुक्‍त पनीर हे सगळे त्रास वेगवेगळ्‍या दिशांनी वाढवणारे असतात अन् वाढवतात.

२. प्रतिदिनच्‍या आहारातून ‘प्रोटीन’ मिळवणे महत्त्वाचे !

जे लोक बैठे काम करतात, जे व्‍यायाम अल्‍प करतात, खाल्लेले पचत नसल्‍याने अशक्‍त वाटल्‍याने ऊर्जा किंवा उत्‍साह मिळावा; म्‍हणून ‘प्रोटीन पावडर’ खातात आणि मग शनिवार-रविवार बाहेर ‘जंक फूड’ (पिझ्‍झा, बर्गर वगैरे) घेतात. यामध्‍ये प्रोटीन खाऊन ते अंगी लागणार नाही. त्‍याचे रूपांतर शेवटी चरबीमध्‍येच होणार हे नक्‍की. ‘मग आम्‍ही प्रोटीन मिळवू तरी कुठून ?’, या प्रश्‍नाचे हेच उत्तर आहे की, प्रतिदिनच्‍या आहारातून. दूध, दूधाचे पदार्थ, ताक, धान्‍य, कडधान्‍य यातून बैठ्या शरिराला आणि थोड्या व्‍यायामाला पुरेसे ‘प्रोटीन’ मिळते. दोन वेळचा आहार चौरस हवा, हे त्‍याचे मूळ !

केवळ ‘प्रोटीन’ वाढवतांना पावडरमध्‍ये गोडपणा आणण्‍यासाठी वापरले जाणारे घटक (स्‍वीटनर) किंवा ‘स्‍टिरॉईडस्’ वापरल्‍याने उद़्‍भवणारे पुरुष वंध्‍यत्‍व, मूत्रपिंड आणि हाडांवर होणारे दुष्‍परिणाम याचा साकल्‍याने विचार करणे महत्त्वाचे ! (३०.११.२०२४)

– वैद्या (सौ.) स्‍वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.