पाकिस्तानात जन्मलेले शेन पेरेरा यांना ‘सी.ए.ए.’ अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल
(‘सी.ए.ए.’ – सिटीझन एमेंडमेंट ॲक्ट – नागरिकत्व सुधारणा कायदा)
पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) – ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (सी.ए.ए.च्या) अधिनियमाच्या अंतर्गत पाकिस्तानात जन्मलेले गोव्यातील रहिवासी शेन सेबॅस्टियन पेरेरा आणि त्यांचे कुटुंबीय यांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. गोव्यात गेल्या ४३ वर्षांपासून वास्तव्यास असलेले शेन पेरेरा यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यापूर्वी ७८ वर्षीय जोसेफ पेरेरा यांना २८ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘सी.ए.ए.’ अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘शेन पेरेरा यांना भारतीय नागरिकत्व त्वरित मिळणे हे ‘सी.ए.ए.’च्या उपयुक्ततेचे प्रमाण आहे. या कायद्यामुळे भारताशी ऐतिहासिक दुवा असलेल्या व्यक्तींना पूर्वजांच्या मातृभूमीशी पुन्हा जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’
काय आहे ‘सी.ए.ए.’ कायदा ?
‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सी.ए.ए.) वर्ष २०१९ मध्ये संमत झाला आणि त्याची वर्ष २०२४ पासून कार्यवाही चालू झाली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या हिंदु धर्मियांसहित शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी या पंथांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.