सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ‘व्हॉटस्ॲप’चा गट दबाव आणणार !
मळगाव येथील बैठकीत नागरिकांची चेतावणी
सावंतवाडी – शहरात बहुउद्देशीय रुग्णालय (मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) होण्यासह जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील रिक्तपदे भरून आरोग्य सेवेत सुधारणा व्हावी, यासाठी सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी ‘व्हॉटस्ॲप’चा गट (सामाजिक माध्यमाचा गट) बनवून त्याद्वारे एकत्र येण्याचा निर्णय मळगाव येथे झालेल्या स्थानिक नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य सेवेत सुधारणा होण्यासाठी २६ जानेवारीला जनआंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक रुग्णालये येथे डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी मिळून ८०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनतेला योग्यप्रकारे आरोग्य सेवा मिळत नाही, असे या वेळी सांगण्यात आले.
या बैठकीत अधिवक्ता संदीप निंबाळकर, अभिमन्यू लोंढे, काका सावंत, भूषण मांजरेकर, वासुदेव भोगले, सुधीर राऊळ, आनंद माळकर, संजय लाड यांच्यासह अन्य स्थानिकांची उपस्थिती होती.
संपादकीय भूमिकाजनतेला अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |