मिळतसे मजसी दिव्यानंद । हृदयी वसे गोविंद ॥
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला. त्या साधनामार्गाने मी साधना करत असतांना माझे स्वभावदोष आणि अहं न्यून होत आहेत. गुरुकृपेने मला आनंद मिळत आहे. अधून-मधून माझ्या मनाची स्थिती पुढीलप्रमाणे असते.
मिळतसे मजसी दिव्य आनंद ।
हृदयी वसे गोविंद ॥ ध्रु. ॥
‘गुरुकृपायोग’ (टीप १) मार्गे साधना केली ।
विषयवासना अहंता मावळली ।
वृत्ती भगवंताकडे वळली ।
न दुजा असे मजला छंद ॥ १ ॥ मिळतसे मजसी…
आनंदाचा झरा मिळाला ।
भेदभाव तो सकल निमाला ।
साधना येई फळाला ।
तुटती मायेचे बंध ॥ २ ॥ मिळतसे मजसी…
भावभक्तीची गंगा भरली ।
गुरुकृपेने गुरुप्राप्ती झाली ।
अपार प्रीती हृदयी जमली ।
सुटला सूक्ष्म गंध ॥ ३ ॥ मिळतसे मजसी…
शांत धरती, शांत अंबर ।
शांत जीवन, शांत मनांतर ।
शांत रहावया वाटतसे निरंतर ।
अंतरी हसे मुकुंद ॥ ४ ॥
मिळतसे मजसी दिव्यानंद ।
हृदयी वसे गोविंद ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विहंगम आध्यात्मिक उन्नतीसाठी सांगितलेला साधनामार्ग
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |