भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगवद़्गीतेतील तत्त्वज्ञानाचा क्रांतीकारकांवर असलेला प्रभाव !
१. भगवद़्गीतेतील तत्त्वज्ञान अंगीकारून इंग्रजांना ‘तुमच्याशी लढण्यासाठी १६ वर्षांनी पुन्हा येईन’, असे सांगणारे दामोदरपंत चापेकर !
‘२६.६.१८९७ या दिवशी, म्हणजेच व्हिक्टोरिया राणीच्या ‘हीरक’ महोत्सवाच्या दिवशी दामोदरपंत चापेकर यांनी इंग्रज अधिकारी रँड यास गोळ्या घालून ठार मारले. ३.२.१८९८ या दिवशी दामोदरपंतांना फाशीची शिक्षा झाली. न्यायमूर्तीला उद्देशून चापेकर म्हणाले, ‘तुम्ही मला फाशी द्याल; परंतु माझा आत्मा ताबडतोब दुसर्या शरिरात प्रवेश करील आणि १६ वर्षांत इंग्रजांबरोबरच्या युद्धात तो पुन्हा उतरलेला असेल.’ येरवड्याच्या तुरुंगात असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या जवळची गीता मागून घेऊन आणि ती हातात घेऊन चापेकर फाशी गेले.
२. क्रांतीकारक कृतीसाठी भगवद़्गीतेचा आधार घेणारे चापेकर बंधू हेच पहिले क्रांतीवीर !
चापेकर बंधूंच्या बलीदानाविषयी लाला लजपतराय लिहितात, ‘‘आपल्या धर्मावरील उत्कट श्रद्धेने एखादी व्यक्ती क्रांतीकारक राजकारणाचे अंतिम पर्व जे बलीदान, ते बलीदानही किती अलौकिक धैर्याने करू शकते !’, याचे प्रात्यक्षिकच चापेकर बंधूंनी दाखवले.’’ त्यापूर्वी इंग्रजी राजवटीत या प्रकारची घटनाच झाली नव्हती. त्यामुळे ‘चापेकर बंधूंसारखे धर्मनिष्ठ लोक स्वधर्माच्या विटंबनेने प्रक्षुब्ध होऊन राजकीय वधाला प्रवृत्त होतील आणि धर्माच्या आधाराने त्याचे समर्थन करतील’, अशी कल्पनाही लोकांच्या ध्यानीमनी आली नव्हती. चापेकर बंधू हे त्या काळी क्रांतीकारक पक्षाचे प्रस्थापक आणि प्रणेते होते. आपल्या क्रांतीकारक कृतीसाठी भगवद़्गीतेचा आधार घेणारे तेच पहिले क्रांतीवीर ! ‘ही भगवद़्गीतेची प्रेरणा त्यांना टिळकांकडून प्राप्त झाली असली पाहिजे’, अशीच तेव्हा अखिल भारताची भावना झाली हाती.
३. ‘चापेकर बंधूंचे पुतळे जागोजागी उभारायला हवेत’, असे सांगणारे स्वामी विवेकानंद !
वर्ष १९०१ मध्ये कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी टिळकांनी स्वामी विवेकानंद यांची भेट घेतली. या भेटीत चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचा विषय निघाला असतांना ‘चापेकर बंधूंचे पुतळे भारतात जागोजागी उभारले गेले पाहिजेत’, असे उद़्गार स्वामी विवेकानंद यांनी काढले.
४. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारकांवर असलेल्या भगवद़्गीतेच्या प्रभावाची चर्चा इंग्रज अधिकार्यांनी त्यांच्या ग्रंथात करणे
‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर भगवद़्गीतेचा किती प्रभाव पडला ?’, याचे विवेचन वर्ष १९१८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘रौलेट समिती’च्या अहवालात करण्यात आले आहे. जेम्स कॅम्पबेल या अधिकार्याने ‘पॉलिटिकल ट्रबल इन इंडिया’ या ग्रंथासाठी संकलित केलेल्या तथ्यांवर तो अहवाल आधारित आहे. या अहवालातील एक प्रकरण ‘साहित्य आणि क्रांती’ या विषयाला वाहिलेले आहे. या प्रकरणात ‘भगवद़्गीता आणि दुर्गासप्तशती’ यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. बंकिमचंद्रांचे साहित्य आणि त्यांची ‘आनंदमठ’ कादंबरी यांचाही त्यात उल्लेख आहे. ‘ढाका अनुशीलन समिती’च्या कार्यालयात गीतेच्या १७ प्रती सापडल्या. माणिकतला येथे गीतेच्या ३ प्रती सापडल्या’, याचाही उल्लेख करण्यात आला आहे. आत्म्याचे अविनाशीत्व, आदर्श पुरुषाची ‘स्थितप्रज्ञ’ कल्पना आणि निष्काम कर्म यांचेही विवेचन करण्यात आले आहे.
५. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘स्वधर्मरक्षणाकरता प्रसंगी युद्ध करणे, हा धर्म आहे’, असे विवेचन त्यांच्या ग्रंथांत करणे
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘धर्मतत्त्व आणि भगवद़्गीता’ या पुस्तकात स्वधर्माचे विवेचन केले आहे, ‘प्रत्येक व्यक्तीचा स्वधर्म सारखा नसतो. काहींचा ‘दुसर्यांना शासन करणे’, हा स्वधर्म असतो, तर काहींचा ‘क्षमा करणे’, हा स्वधर्म असतो. ‘शत्रूवर आघात करणे’, हा सैनिकांचा स्वधर्म आहे, तर ‘जखमींना औषधोपचार करणे’ हा वैद्याचा स्वधर्म आहे. युद्ध करणे यासारखे कोणतेही दुष्कृत्य नाही; परंतु कधी कधी परिस्थिती अशी येते की, हे दुष्कृत्य अटळ बनते. ‘तैमूरलंग आणि नादिरशहा देशावर आक्रमण करण्यासाठी येत आहेत’, हे कळल्यावर ‘ज्याला लढता येते, त्याने त्यांच्याशी युद्ध करणे’, हाच धर्म आहे.’
– डॉ. रवींद्र वामन रामदास
(साभार : मासिक ‘जीवन विकास’, जुलै १९९०)
संपादकीय भूमिकाकुठे गीता हातात घेऊन देशासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीकारक अन् कुठे लांगूलचालनासाठी गीतेवर बंदीची मागणी करणारे राजकारणी ! |