Rohingya Settled In Pune : रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर !

आधारकार्ड आणि भारतीय पारपत्रही मिळवले !

घुसखोर रोहिंग्या मुजम्मिल महंमद अमीन खान आणि त्याने पुण्यात बांधलेले स्वतःचे घर !

पुणे : मुजम्मिल महंमद अमीन खान या घुसखोर रोहिंग्याने पुण्यात देहूरोड येथे त्याचे घर बांधले असल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले आहे. त्याने कोणतेही कागदपत्र स्वतः सादर न करता केवळ ५०० रुपयांत आधारकार्ड मिळवले. त्यानंतर भारतीय नागरिक म्हणून वावरतांना स्वतःसाठी आणि पत्नीसाठी भारतीय पारपत्रही मिळवले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या देहूरोड पोलीस ठाण्यात २७ जुलै २०२४ या दिवशी खान आणि अजून एक रोहिंग्या घुसखोर शेख अन् त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांकडून भ्रमणभाष, सीमकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, भारतीय पारपत्र जप्त केले आहे. पोलिसांनी सांगितले की, संशयितांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

अन्वेषणात उघड झालेल्या गंभीर गोष्टी !

१. खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना (इस्लामी अभ्यासक) बनण्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तो त्याची पत्नी आणि २ मुलींसह म्यानमार येथे रहात होता; मात्र त्याने डिसेंबर २०१२ मध्ये कुटुंबासह बांगलादेशात स्थलांतर केले. त्यानंतर खान याने वर्ष २०१३ मध्ये बेकायदेशीर मार्गाने बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून स्वत:ची दुसरी पत्नी आणि मुले यांसह भारतात घुसखोरी केल्याचा आरोप आहे.

२. त्यानंतर तो रेल्वेने पुण्यात आला आणि तळेगाव एम्.आय.डी.सी.तील एका खासगी आस्थापनात नोकरीला लागला. आस्थापनाने दिलेल्या खोलीत कुटुंबासह राहू लागला. या आस्थापनातील एका कर्मचार्‍याचा अद्याप शोध लागलेला नसून म्यानमार आणि बांगलादेशामधून लोकांना पुण्यात आणण्यात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. (पोलीस यंत्रणांनी अशांची पाळेमुळे खोदून अशांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे ! – संपादक)

३. त्याने भिवंडीतील एका दुकानातून कोणतेही कागदपत्र न देता केवळ ५०० रुपये देऊन आधारकार्ड घेतल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. भिवंडीतील दलालांनी आधार केंद्रात खानच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याला आणि त्याच्या पत्नीलाही आधारकार्ड मिळाले. (स्थानिक राष्ट्रद्रोही धर्मांधांचे साहाय्य आणि प्रशासनातील भ्रष्टाचार या गोष्टी बांगलादेशींकडे आधारकार्ड आणि पारपत्र असण्यास कारणीभूत आहेत ! – संपादक) खानने कोणतीही कागदपत्रे न देता भूमी कह्यात घेऊन त्यावर घर बांधले. कोणत्याही पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास न येता, खान भारतीय नागरिक असल्याचे भासवत अनुमाने १० वर्षे कुटुंबासह येथे रहात होता.

४. जुलैमध्ये महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाचे पोलीस हे शाहीद उपाख्य सोहिद्दुल शेख या संशयितासह खानच्या घरी धडकले. शेख रोहिंग्या असून पोलिसांनी त्याला देहूरोड भागातच पकडले होते. वर्ष २०१५ पासून तो स्वत:च्या पत्नीसह भारतात बेकायदेशीरपणे रहात असल्याचा आरोप आहे. चौकशीच्या वेळी शेखने पोलिसांना सांगितले की, देहू रोडचा मुजम्मिल मामू हाही म्यानमारचा नागरिक आहे. त्यानंतर पोलिसांनी मुजम्मील खानला कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

  • घुसखोर खोटी कागदपत्रे बनवून घेतात, याचा पोलीस किंवा प्रशासन यांना थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! म्यानमारमधून हाकलून लावलेले रोहिंग्या मुसलमान मोठ्या प्रमाणावर भारतात घुसखोरी करत आहेत. रोहिंग्या मुसलमान भारतासाठी धोकादायक आहेत, असे अनेक तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे अन्य देशांप्रमाणे घुसखोरीच्या विरोधात कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची कार्यवाही केली पाहिजे !
  • बांगलादेशी आणि रोहिेंग्या घुसखोरांना खोटी कागदपत्रे देणार्‍या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही राष्ट्रद्रोही गुन्ह्याखाली अटक करणे आवश्यक !