जत (जिल्हा सांगली) येथे अफझलखानवधाचा फलक पोलीस अधिकार्‍यांनी केला जप्त !

  • पोलीस अधिकार्‍यांकडून फलकाची विटंबना, हिंदुत्वनिष्ठ संतप्त !

  • आमदार गोपीचंद पडळकर यांची पोलिसांना चेतावणी

प्रतिकात्मक छायाचित्र

जत (जिल्हा सांगली) – शहरात ८ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवप्रतापदिनानिमित्त ‘अफझलखानवधा’चा डिजिटल फलक लावण्यात आला होता; मात्र जत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍यांनी पथकासह येऊन हा फलक जप्त केला. हा फलक जप्त करतांना तो फाडला गेल्याने या फलकाची विटंबना झाली. त्यामुळे सांगली जिल्ह्यात पोलिसांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, तर जत येथील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कृतीचा निषेध करून ‘येथील पोलीस अधिकार्‍याला सुतासारखा सरळ करू’, अशी चेतावणी दिली आहे. (खरा इतिहासच दाखवण्यास पोलीस आक्षेप घेऊ लागले, तर पुढील पिढीला खरा इतिहास समजणार कसा ? – संपादक)

१. जत शहरासह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. जत शहरातून श्री शिवप्रतिष्ठाच्या वतीने फेरी काढण्यात आली.

२. शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केल्याचा ‘डिजिटल’ फलक एका मंदिर परिसरात लावला होता; मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जत पोलिसांनी हा फलक जप्त केला. (खरा इतिहास दाखवल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न का निर्माण व्हावा ? हा भारत आहे कि पाक ? – संपादक)

३. पोलिसांनी हा फलक जप्त करतांना तो चारही बाजूंनी कापून फलकाची घडी घालून जप्त केला. या प्रकाराचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या हिंदुत्वनिष्ठांनी निषेध व्यक्त केला. या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर त्वरित प्रसारित झाले आहे.

हिंदुविरोधी कारस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

श्री. गोपीचंद पडळकर

या घटनेविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘जत शहरात घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा फलक फाडणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला सुतासारखे सरळ केले जाईल.

मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की, त्यांनी संयम राखावा. महायुती हे हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आहे. हिंदुविरोधी कारस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कुणीही असो, त्याला गुडघ्यावर बसवून आणि नाक घासून उभ्या महाराष्ट्राची क्षमा मागावी लागेल.’’

संपादकीय भूमिका

  • ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?
  • दंगलींच्या काळात असे पोलीस कधी तरी हिंदूंचे रक्षण करतील का?