कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढण्याच्या काँग्रेसींच्या वक्तव्याचा विधान परिषदेत निषेध !
संयुक्त महाराष्ट्र प्राप्त होईपर्यंत लढा चालू ठेवू ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’, असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचा मानबिंदू आहेत. २ वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेले सावरकर एकमेव आहेत. त्यांनी मराठीची सेवा केली. अशा स्वातंत्र्यविरांचे चित्र काँग्रेसच्या नेत्यांनी कर्नाटक विधानसभेतून काढण्याची घोषणा केली आहे. याचा महाराष्ट्रासह देशातील सर्व मराठी भाषिक म्हणून आम्ही निषेध करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केले.
‘स्वा. सावरकरांची प्रतिमा काढण्यात येणार नाही’, असे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु.टी. खादर यांनी कर्नाटक येथे सांगितल्याचे समजते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अत्याचार करत असल्याचे सूत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडले. त्यावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जोपर्यंत संयुक्त महाराष्ट्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत ही लढाई सर्वोच्च न्यायालयात आम्ही लढत राहू.’’