‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल होणार ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिमहा २० सहस्र रुपये सन्‍मान निधी देण्‍यात येणार

मुंबई – ‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल करण्‍यात येतील, तसेच प्रतिमहा २० सहस्र रुपये सन्‍मान निधी देण्‍याच्‍या शासन निर्णयावर येत्‍या आठवड्यात कार्यवाही करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतल्‍यानंतर मंत्रालय आणि ‘विधिमंडळ वार्ताहर संघा’च्‍या वतीने अध्‍यक्ष प्रमोद डोईफोडे यांच्‍या हस्‍ते मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्‍या वेळी त्‍यांनी ही घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस

माजी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय आणि ‘विधिमंडळ वार्ताहर संघा’च्‍या ९ मे २०२३ या दिवशी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात झालेल्‍या पुरस्‍कार वितरण कार्यक्रमात सन्‍माननिधी वाढवण्‍याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्‍यापूर्वी मार्च २०२४ मध्‍ये राज्‍य सरकारने राज्‍यातील निवृत्त पत्रकारांना देण्‍यात येणार्‍या सन्‍माननिधी योजनेची प्रतिमहा देण्‍यात येणारी रक्‍कम ११ सहस्र रुपयांऐवजी २० सहस्र रुपये करण्‍याचा शासन निर्णय जारी केला; मात्र त्‍याची अजूनही कार्यवाही करण्‍यात आली नसल्‍याचे डोईफोडे यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.

‘महायुती सरकारने लाडक्‍या बहिणींचा सन्‍मान केला, तसा सन्‍मान राज्‍यातील ज्‍येष्‍ठ पत्रकारांचा करून त्‍यांनाही दिलासा द्यावा’, अशी मागणी डोईफोडे यांनी केली. त्‍यानंतर ‘येत्‍या आठवड्यात वरील कार्यवाही केली जाईल’, अशी घोषणा मुख्‍यमंत्र्यांनी केली.