सत्तरी तालुक्याच्या विकासाला सरकारकडून पूर्ण सहकार्य ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्तरीतील विविध विकासकामांचा शुभारंभ

पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – सत्तरीच्या विकासाला सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्यात आले असून यापुढेही सत्तरीतील विकासकामे गतीने होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. ९ डिसेंबर या दिवशी मोर्ले कॉलनी येथील कम्युनिटी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात सत्तरी तालुक्यातील विविध प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार डॉ. देविया राणे आणि सत्तरी तालुक्यातील सर्व जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य उपस्थित होते.

या प्रसंगी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार डॉ. देविया राणे यांनी सत्तरीचा चौफेर विकास केला आहे. सत्तरीतील पाण्याविषयीची समस्या दूर करण्यासाठी मोर्ले येथील १५ एम्एल्डी पाणीप्रकल्प काम पूर्ण करणे; केरी, सत्तरी येथील प्रसिद्ध आजोबा देवस्थानचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण; ११ के.व्ही. भूमीगत वीजवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करणे; अंजुणे धरण परिसरात पर्यटन विकास, अशी विविध कामे पूर्ण होणार आहेत. मंत्री विश्वजीत राणे आणि आमदार डॉ. देविया राणे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे.’’ मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेल्या वरील सर्व प्रकल्पांची या वेळी पायाभरणी करण्यात आली.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘आम्ही सत्तरीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी धडपडत आहोत. सत्तरीतील ग्रामीण लोकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांना संमती देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. सत्तरीतील पाणी आणि वीज यांची समस्या लवकरच दूर होईल. त्यामुळे मूलभूत सुविधांपासून कुणीही वंचित रहाणार नाही.’’

आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या, ‘‘आज पायाभरणी झालेल्या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याबरोबरच त्यांना अत्यावश्यक सुविधाही मिळतील. हे माझ्या मतदारसंघासाठी पूरक ठरेल. सरकारकडून उभारले जाणारे विकासप्रकल्प जनतेच्या विकासासाठी हातभार लावणारे ठरत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे.’’