ध्वनीप्रदूषणासंबंधी अवमान याचिकेवरील सुनावणी १३ डिसेंबरपर्यंत स्थगित
पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – हणजूण येथील मोठ्या आवाजातील संगीतामुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाशी संबंधित अवमान याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने आता १३ डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याविषयी ३ आस्थापनांवर कारवाई चालू करण्यात आल्याची माहिती सरकारने न्यायालयाला दिली. यांपैकी २ प्रकरणांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक आवाजात संगीत वाजवल्याबद्दल संबंधित आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तिसर्या प्रकरणात ज्या आस्थापनांमध्ये कोणत्याही अनुमतीविना मोठ्याने संगीत वाजवले जात होते आणि ध्वनीक्षेपक अन् वाद्ये जोडली होती, त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात येऊन ती आस्थापने बंद करण्यात आली असल्याची माहिती सरकारने न्यायालयाला दिली.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला होणार्या ध्वनीप्रदूषणावरही सुनावणी होणार
दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर प्रतिमा उत्सवाच्या रात्री रात्रभर झालेले ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांना आलेल्या अडचणी यांविषयी वृत्तपत्रांनी दिलेली वृत्ते निष्पक्षपाती सल्लागारांनी (ॲमिकस क्युरी यांनी) न्यायालयासमोर आणल्यानंतर उच्च न्यायालयाने ‘या सर्व प्रकरणांची सुनावणी १३ डिसेंबरला करणार’, असे सांगितले असल्याची माहिती महाअधिवक्ता देवीदास पांगम यांनी दिली.
संपादकीय भूमिकापोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीय असल्यानेच ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात लोकांना स्वखर्चाने न्यायालयीन लढा द्यावा लागतो ! |