Delhi Schools Bomb Threat : देहलीतील ४० हून अधिक शाळांना बाँबस्फोट घडवण्याची धमकी

धमकी देणार्‍याने मागितले ३० सहस्र अमेरिकी डॉलर्स (२५ लाख ४१ सहस्र रुपये)

नवी देहली – येथील ४० हून अधिक शाळांना सकाळी ई-मेलद्वारे तेथे बाँब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये मदर मेरी स्कूल, ब्रिटीश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूल आदींचा समावेश आहे. ई-मेल पाठवणार्‍याने बाँबचा स्फोट न करण्याच्या बदल्यात ३० सहस्र अमेरिकी डॉलर्स मागितले आहेत. पोलिसांनी शाळांची तपासणी केल्यावर कुठेही बाँब आढळून आले नाहीत. मे २०२४ मध्येही देहलीमध्ये १५० हून अधिक शाळांमध्ये बाँबस्फोटांच्या धमक्या देणारे ई-मेल पाठवण्यात आले होते.

८ डिसेंबरला रात्री ११.३० च्या सुमारास हे ई-मेल पाठवण्यात आले. त्यात लिहिले आहे की, मी इमारतीच्या आत अनेक बाँब पेरले आहेत. बाँब आकाराने लहान आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीची फारशी हानी होणार नाही; मात्र स्फोट झाल्यास अनेक जण घायाळ होतील. जर मला ३० सहस्र अमेरिकी डॉलर्स मिळाले नाहीत, तर मी बाँबचा स्फोट करेन.