एकतारी

‘माझे मन मोहामध्‍ये गुंतून पडले. माझ्‍या मनात सतत तेच विचार असतांना मधून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या आठवणीची एकतानता (एकाग्रता) साधली जाते. त्‍या वेळी मायेतील सर्व गोष्‍टींचा विसर पडतो. पुन्‍हा मोहाचे आवरण दाटून आले की, त्‍यांच्‍यापासून मन दूर होते. असा हा लपंडाव चालू असतो. या काळात साधक भेटतात, काहीतरी बोलतात. त्‍या वेळी पुन्‍हा एकदा हृदयीची तार छेडली जाते. तो तार छेडणारा रामनाथी आश्रमाचा, वैकुंठाचा स्‍वामी असलेला चक्रपाणी एकांतात बसून माझी वाट पहात असतो. ही एकच तार आहे, जी माझ्‍या हृदयापासून त्‍याच्‍या हृदयापर्यंत आणि अशी अनेकानेक साधकांच्‍या हृदयापर्यंत एकाच रूपात जोडलेली आहे. ही एकतारी आहे. काही क्षण असे वाटते, ‘तिचा तंतू तुटला’; परंतु ‘तो चक्रपाणी कधी ती जोडतो’, हे कळतच नाही. सतत तो ती तार छेडतो. त्‍यामुळे साधकाचे मन अधीर होते; त्‍याच्‍या स्‍मरणात दंग होते. भगवंत आणि त्‍याची माया यांचा लपंडाव साधकाच्‍या मनात चालू असतो. साधक त्‍यात रममाण होतो. खरेखोटे विसरतो; परंतु या खेळाचा स्‍वामी तो भगवंत ती तार परत परत छेडतो आणि साधकाला त्‍याच्‍या हृदयापर्यंत खेचून घेतो. ‘भगवंताच्‍या या खेळाचे शब्‍दातीत रूप म्‍या पामराने शब्‍दबद्ध करण्‍याचा केलेला हा अंधुकसा प्रयत्न त्‍याने आपला मानावा’, ही त्‍याच्‍या चरणी प्रार्थना !

श्री. धैवत वाघमारे

छेडिता तार हृदयीची ।
निनादे मंगल ध्‍वनी श्रवणी ।
तंतू एकतारीचा जोडितो चक्रपाणी ।
शोधितो मी तया अंतःकरणी ॥ १ ॥

वाटे कधी फिरूनी ।
रहावे माया उपलक्षी ।
परि जोडितो ऐसी एकतारी ।
ओढ लागते ऐकोनी अंतर्ध्‍वनी ॥ २ ॥

स्‍वर तयाचे उमटिता मनी ।
अधीरता साठे नयनी ।
साद तुझी ऐकोनी ।
अर्पितो जीवन तव चरणी ॥ ३ ॥

श्रीःशरणम् ।’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक