केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानात वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू
‘आपला पेहराव संस्कृतीला धरून असावा’, ही संकल्पना लागू
(वस्त्रसंहिता : मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
फोंडा, ८ डिसेंबर (वार्ता.) – केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘आपला पेहराव संस्कृतीला धरून असावा’ ही संकल्पना मंदिरात लागू करण्यात आली आहे.
मंदिराचे पावित्र्य टिकून रहावे, याकरता देवस्थानाला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक आणि भक्त यांनी साधा आणि पारंपरिक पेहराव घालूनच मंदिर परिसरात यावे. शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडी, ‘स्लीव्हलेस टॉप’ (हाताच्या बाह्या नसलेला पोशाख), लो-साईज (अल्प उंचीच्या) जीन्स आणि तोकडे टी-शर्ट परिधान करणार्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अनावधानाने तोकडे कपडे घालून आलेल्यांसाठी पर्यायी कपड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन श्री विजयादुर्गा देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘आपला पेहराव संस्कृतीला धरून असावा’ संकल्पना !
मंदिरात प्रवेश केल्यावर मोठा आरसा असलेले एक कपाट ठेवण्यात आले आहे. कपाटावर दर्शनीय भागात ‘आपला पेहराव संस्कृतीला धरून असावा’, असे ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करणार्याने कपाटावरील आरशात पाहून आपला पेहराव संस्कृतीला धरून आहे कि नाही? हे पाहून योग्य निर्णय स्वत:च घ्यावा, अशी ही संकल्पना आहे. या कपाटात कुंकू लावण्यासाठी डबीही ठेवण्यात आली आहे.
म्हार्दाेळ येथील मंदिर परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता
गोमंतक मंदिर महासंघाने हल्लीच म्हार्दाेळ येथे राज्यव्यापी मंदिर परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये गोव्यातील मंदिरांच्या विश्वस्तांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानाचे सचिव श्री. राजेंद्र देसाई यांनीही सहभाग घेतला होता. या परिषदेत श्री. राजेंद्र देसाई यांनी केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानात लवकरच ‘ड्रेस कोड’ लागू करणार असल्याचे सांगून मंदिरात प्रवेश करतांना पुरुषांनी टिळा लावून प्रवेश करावा, अशी माफक अपेक्षा असल्याचे म्हटले होते. या आश्वासनाची आता पूर्तता झाली आहे.
या विषयी श्री. राजेंद्र देसाई पुढे म्हणाले, ‘‘मंदिरात प्रवेश करतांना ‘नसावे’ याऐवजी ‘काय असावे’, यावर आम्ही भर दिला आहे.