रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. सिद्धी गावस हिला झालेले तीव्र आध्यात्मिक त्रास आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केल्यावर तिच्यामध्ये झालेले पालट !
‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला माझ्यामध्ये झालेले पालट लिहून द्यायला सांगितले होते. तेव्हा ‘माझ्यामध्ये जे पालट झाले आहेत, त्यासाठी साधकांनी मला पुष्कळ साहाय्य केले आहे’, हे आठवून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. ‘कठीण परिस्थितीत साधकांनी मला कसे साहाय्य केले ?’, याविषयी मला सांगावेसे वाटते.
काही वर्षांपूर्वी मला पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे (समष्टी) संत) म्हणाले होते, ‘‘तू रामनाथी आश्रमाच्या सात्त्विक वातावरणात राहिल्यामुळे तुझ्यामध्ये पालट झाले आहेत.’’ खरोखर असेच आहे. मी प्रयत्न केल्यामुळे नव्हे, तर त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी साधकांच्या साहाय्यामुळे मी त्रासातून बाहेर पडू शकलेे. मला होणारा आध्यात्मिक त्रास, त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडून झालेले प्रयत्न, साधकांनी मला केलेले साहाय्य आणि त्रासातून बाहेर पडल्यावर माझ्यामध्ये झालेले पालट, यांविषयीची सूत्रे मी येथे दिली आहेत.
१. साधनेत येण्यापूर्वी
शालेय जीवनात असतांना मला सकाळी लवकर उठून वेळेत आवरणे जमत नसे. त्यामुळे मला घरातून शाळेत जायला पुष्कळ विलंब व्हायचा. आईला सकाळी आमचा तिघांचा (बाबा, मी आणि दादा (माझा भाऊ) यांचा) डबा करावा लागे. त्यामुळे ती व्यस्त असे. मी शाळेत जातांना वाटेतच अल्पाहार करायचे आणि शाळेत गेल्यावर वेणी घालायचे. मी शाळेत ९० टक्के गुण मिळवणारी विद्यार्थिनी होते. ५ वी च्या वर्गात गेल्यापासून माझ्या आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ झाली होती.
२. साधना करू लागल्यावर झालेले विविध आध्यात्मिक त्रास
२ अ. अनावश्यक विचार करणे : मी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यावर पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले. मी बालवर्गात असल्यापासून ते वर्ष २०१९ पर्यंत माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार यायचे. मला पूर्वजांचा त्रास होता. आरंभी आश्रमात आल्यावरही माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार यायचे. त्यामुळे मला रडू यायचे. मी नेहमी आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांना भ्रमणभाष करून माझ्या त्रासाविषयी सांगत असे.
२ आ. मला घुसमटल्यासारखे होत असे. माझी साधना नीट होत नसल्यामुळे मला निराशा यायची.
२ इ. काहीही न सुचणे : मी पुष्कळ आळशी होते. मला काही सुचत नसे. मी निवासस्थानाहून आश्रमात ‘बस’ने येत असे. तेव्हा मी झोपेतून उठून तशीच न आवरलेल्या स्थितीत येत असे; कारण मी सकाळी ६ वाजता उठले, तरी माझे ८ वाजेपर्यंत आवरत नसे.
३. सहसाधिकांनी केलेले साहाय्य
अ. मी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर मला सहसाधिकांनी पुष्कळ साहाय्य केले, उदा. वैयक्तिक आवरणे, कपडे वाळत घालणे, माझे सामान आवरणे इत्यादी.
आ. माझ्या स्वभावदोषांमुळे माझ्या सहसाधिकांना पुष्कळ त्रास व्हायचा, तरीही त्या मला कधीच काही बोलल्या नाहीत. त्या मला समजावून सांगत असत आणि मला सांभाळून घेत असत.
४. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी केलेले साहाय्य
४ अ. समुपदेशन करणे : मी सतत रडायचे. मला नैराश्य यायचे आणि माझ्या मनात सतत अनावश्यक विचार असायचे. तेव्हा आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी मला समुपदेशनाच्या माध्यमातून पुष्कळ साहाय्य केले.
४ आ. स्वतःचे जीवन चांगले बनवण्यासाठी प्रोत्साहन देणे : वर्ष २०२३ मध्ये माझ्या त्रासाची तीव्रता पुष्कळ वाढली. नऊ मासांपूर्वी आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी मला समजावले, ‘‘स्वतःला अनिष्ट शक्तींच्या कह्यात जाऊ देऊ नकोस. तुला सन्मानाने जगायचे आहे. तूच स्वतःचे जीवन चांगले बनव.’’ त्या क्षणापासून मला होणारे सर्व त्रास संपले. तेव्हापासून मला अनिष्ट शक्तींचा त्रास झाला नाही. कधी ‘अनिष्ट शक्तींचा त्रास होईल’, असे मला वाटले, तर ‘माझ्या कोणत्या स्वभावदोषांमुळे अनिष्ट शक्तींचा त्रास होत आहे’, ते माझ्या लक्षात येते आणि मला त्यावर मातही करता येते.
५. स्वतःमध्ये झालेले पालट
५ अ. वैयक्तिक आवरण्यास अल्प वेळ लागणे : सेवेमुळे माझ्यामध्ये पुष्कळ पालट झाले. आता मी लवकर झोपते आणि पहाटे ४ वाजता उठते. त्यामुळे आता मी सेवेच्या ठिकाणी वेळेत जाते. पूर्वी मला सकाळी वैयक्तिक आवरायला ५ घंटे लागायचे. आता मला अडीच घंटे लागतात. पूर्वी मला जेवायला पुष्कळ वेळ लागायचा. आता १५ मिनिटांमध्ये माझे जेवण होते.
५ आ. भ्रमणभाष पहाण्यात अनावश्यक वेळ न घालवणे : पूर्वी मी भ्रमणभाष पहाण्यात पुष्कळ वेळ वाया घालवत असे. आता मला ‘भ्रमणभाष पहावा’, असे वाटत नाही. दिवसभरातून १ – २ मिनिटे अनावश्यक भ्रमणभाष पाहिला, तरी मी त्यासाठी प्रायश्चित्त घेते.
५ इ. ऐकण्याच्या स्थितीत येणे
१. माझा त्रास उणावल्यानंतर अनेक साधकांनी मला सांगितले, ‘पूर्वी तू काहीच ऐकण्याच्या स्थितीत नव्हतीस; म्हणून आम्हाला तुझ्याशी बोलावेसे वाटत नसे; पण आता तुझ्यामध्ये पुष्कळ पालट झाले आहेत.’
२. आधी मला ‘माझ्या मनाप्रमाणे व्हावे’, असे तीव्रतेने वाटायचे. आता मनाप्रमाणे झाले नाही, तरी मला ते स्वीकारता येते. आता प्रसंग मनात न रहाता विसरला जातो.
३. पूर्वी मी सतत रडायचे. आता मागील ८ – ९ मासांत केवळ एकदाच असा प्रसंग घडला आणि मला त्या प्रसंगातून अल्प कालावधीतच बाहेर पडता आले.
४. माझा साधना करण्याचा दृढ निश्चय झाला असल्याने कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले, तरी मला तिचा त्रास होत नाही.
५ उ. यापूर्वी मी घरी गेल्यावर आळशीपणा करायचे किंवा आवडीनुसार सेवा करायचे. आता माझा घरातील व्यक्तींना साहाय्य करण्याचा भाग वाढला आहे.
(क्रमश:)
– कु. सिद्धी गावस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०२४)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/862360.html
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |