देवता, संत, राष्ट्रपुरुष यांच्या स्मरणात घेतली आमदारकीची शपथ !
८ जणांचा शपथविधी प्रलंबित !
मुंबई, ८ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी उर्वरित १०६ लोकप्रतिनिधींनी आमदारकीची शपथ घेतली. ७ डिसेंबर या दिवशी १७३ लोकप्रतिनिधींनी आमदारकीची शपथ घेतली आहे, तर हंगामी अध्यक्षपदी असलेले कालिदास कोळंबकर यांनी राज्यपालांकडून शपथ घेतली. त्यामुळे राज्यातील २८८ पैकी अद्याप ८ जणांचा शपथविधी प्रलंबित आहे. आतापर्यंत शपथ घेतलेल्या २७९ पैकी बहुतांश लोकप्रतिनिधींनी देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचे स्मरण करत आमदारकीची शपथ घेतली.
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह अनेक आमदारांनी स्वत:च्या आराध्यांचे स्मरण करत आमदारकीची शपथ घेतली. बहुतांश आमदारांनी ईश्वराला साक्षी मानून शपथ घेतली, तर मोजक्या लोकप्रतिनिधींनी ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो’ म्हणत शपथ घेतली. ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता अधिवेशनाला प्रारंभ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली शपथ घेतली.
काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी शपथ घेतांना दाखवली राज्यघटना !
काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी शपथ घेतांना समवेत संक्षिप्त राज्यघटनेचे पुस्तक घेतले होते. शपथ घेतल्यावर काँग्रेसच्या सर्व लोकप्रतिनिधींनी ‘जय संविधान’ म्हणत हे राज्यघटनेचे पुस्तक दाखवले.
८ लोकप्रतिनिधींचा शपथविधी प्रलंबित !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उत्तम जानकर, जयंत पाटील, शिवसेनेचे आमदार विलास भुमरे, ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई, मनोज सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम, सुनील शेळके आणि जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे सभागृहात अनुपस्थित असल्यामुळे अद्यापही या लोकप्रतिनिधींचा शपथविधी झालेला नाही.
शपथ घेण्यामधील वैशिष्ट्ये !
१. ९२ लोकप्रतिनिधींनी ‘ईश्वरसाक्ष’, तर ७ आमदारांनी ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो’, असे म्हणत शपथ घेतली.
२. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजू खरे यांनी गौतम बुद्ध यांना साक्ष मानून शपथ घेतली.
३. शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी अल्ला आणि ईश्वरसाक्ष म्हणून, तर काँग्रेसचे अस्लम शेख आणि अमिन पटेल या आमदारांनी ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो’ म्हणत शपथ घेतली.
४. मंगलप्रभात लोढा आणि सत्यजीत देशमुख या भाजपच्या आमदारांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
५. वाशिमचे भाजपचे आमदार श्याम खोडे यांनी प.पू. सरसंघचालक कै. डॉ. हेडगेवार यांचे स्मरण करत शपथ घेतली.
६. धुळे शहर मतदारसंघातील भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी ‘अहिराणी’ भाषेत शपथ घेतली.
७. अनेक आमदारांनी ‘जय श्रीराम’, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा जयघोष करत शपथ घेतली. काही आमदारांनी गोमातेचा जयघोष केला.