कलियुगात मानवाला तारणारा एकमेव मार्ग म्‍हणजे हिंदु धर्म !

महान हिंदु धर्माचे स्‍वरूप विशद करणारी नवीन लेखमाला !

भाग १.

१. हिंदु धर्म-संस्‍कृतीच्‍या वैभवाची महानता !

‘भारत म्‍हणजे पुण्‍यभूमी ! अध्‍यात्‍म, परमार्थ-चिंतन, अंतर्मुखता आणि आत्‍मसाक्षात्‍कार यांचे माहेरघर, म्‍हणजे भारताची पवित्र भूमी आहे. मानवी संस्‍कृतीचा उषःकाल आणि परोत्‍कर्ष भारतानेच पाहिला ! जीव, जगत् आणि जगदीश यांचे तत्त्वचिंतन भारतातच प्रकट झाले. आत्‍म्‍याच्‍या अमरत्‍वाचे सर्वप्रथम ज्ञान हिंदु धर्मातील आत्‍मसाक्षात्‍कारी महापुरुषांनाच पूर्णतः झाले.

विद्यावाचस्‍पति शंकर वासुदेव अभ्‍यंकर

भारतातील हिंदु धर्म-संस्‍कृतीच्‍या ज्ञान-विज्ञान लाटा आज जगात पसरल्‍या आहेत. ग्रीस आणि रोम ही राष्‍ट्रे ज्‍या वेळी अस्‍तित्‍वात नव्‍हती, युरोप अन् अमेरिका, ही नावेही जन्‍माला आली नव्‍हती, त्‍या वेळी हिंदु धर्म-संस्‍कृतीने वैभवाचे परमोच्‍च शिखर गाठले होते.

सर्वेऽपि सुखिनः सन्‍तु सर्वे सन्‍तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्‍यन्‍तु मा कश्‍चिद़् दुःखमाप्‍नुयात् ॥

अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्‍य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्‍याण पाहोत. कुणाच्‍याही वाट्याला कधीही दुःख न येवो.

२. विविध संस्‍कृती काळाच्‍या ओघात नष्‍ट होण्‍यामागील कारण

जगात अनेक संस्‍कृती जन्‍माला आल्‍या आणि काळाच्‍या ओघात नाश पावल्‍या. जगातील एकमेव जिवंत संस्‍कृती हिंदु धर्माचीच आहे. तिचे एकमेव रहस्‍य हेच की, हिंदु संस्‍कृतीने धर्म आणि मोक्ष हे प्रधान पुरुषार्थ मानून अर्थ अन् काम यांना दुय्‍यम स्‍थान दिले. अर्थ आणि काम यांना प्रधान मानलेल्‍या सर्व संस्‍कृती काळाच्‍या ओघात नष्‍ट झाल्‍या. आजही भौतिक प्रगती केलेल्‍या आणि जगावर राज्‍य करू पहाणार्‍या राक्षसी अन् तामसी संस्‍कृतींची तीच गत होणार आहे.

३. अमृततत्त्व आणि विश्‍वशांती यांचे महाव्रत पुढे चालवणारी हिंदु धर्म-संस्‍कृती !

जगातील प्रत्‍येक मानवाला धर्म-संस्‍कृतीला देण्‍यासारखे भारताकडे होते, आहे आणि पुढेही रहाणार आहे; म्‍हणूनच हिंदु धर्म-संस्‍कृतीची महत्ता अक्षुण्‍ण (भंग न पावलेला), अजरामर आहे. शतकानुशतकांचे धर्मांध प्रहार आणि आक्रमणे पचवून अनादि-अनंत हिंदु धर्म-संस्‍कृती अमृततत्त्व आणि विश्‍वशांती यांचे महाव्रत पुढे चालवत आहे.

४. हिंदु धर्माचे जागतिक महत्त्व

धर्म हाच आमच्‍या राष्‍ट्राचा महाप्राण आहे. ‘विविधतेतील एकता’ हाच हिंदु संस्‍कृतीचा परवलीचा शब्‍द आहे. ‘जगातील सर्व धर्म, संप्रदाय, पंथ, हे सत्‍याचेच लहान मोठे आविष्‍कार आहेत’, हे मानणारा जगातील एकमेव धर्म, म्‍हणजे हिंदु धर्म होय. आत्‍मसाक्षात्‍कारी आचार्य, संत, लोकोत्तर महापुरुष या सर्वांनी भारत आणि हिंदु धर्म संस्‍कृतीला धन्‍य केले आहे.

५. हिंदु धर्म-संस्‍कृतीचा अभ्‍यासक्रमात समावेश होणे आवश्‍यक !

आज नवीन पिढ्यांना हिंदु धर्म-संस्‍कृती या गौरवशाली परंपरेचा परिचयच नाही; कारण हिंदु धर्म-संस्‍कृतीचा अभ्‍यासक्रमात समावेश नाही. कलियुगात मानवाला तारणारा एकच मार्ग आहे, ‘हिंदु धर्म संस्‍कृती !’, ‘जगा आणि जगू द्या’, असे म्‍हणणारी, तसे आचरण करणारी जगातील एकमेव संस्‍कृती म्‍हणजे हिंदु धर्म संस्‍कृतीच आहे. आज जगाला केवळ हिंदु धर्म संस्‍कृतीच तारू शकेल ! शुभं भवतु !

(क्रमशः)

– विद्यावाचस्‍पति शंकर वासुदेव अभ्‍यंकर, संत वाङ्‍मयाचे अभ्‍यासक, लेखक आणि प्रवचनकार, पुणे. (६.४.२००८)

(साभार : ‘हिंदु धर्म संस्‍कृती ग्रंथमाला १’ – ‘हिंदु धर्माचे स्‍वरूप’)

लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/861987.html