भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !
३ ते १६ डिसेंबर १९७१ या कालावधीत झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात मिळालेल्या विजयाच्या निमित्ताने…
३ डिसेंबर १९७१ या दिवशी भारताच्या १० विमानतळांवर ‘प्री-एम्प्टीव्ह’ आक्रमण (शत्रूचे आक्रमण होण्यापूर्वीच त्याच्या सैन्यबळाची शक्ती न्यून करण्यासाठी हवाई आक्रमण योजणे) करून पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पूर्व पाकिस्तानातील ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीने समाप्त होऊन भारताचा प्रचंड विजय झाला. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वर्ष १९७१ चे युद्ध म्हणजे राष्ट्रीय उद्दिष्ट आणि संघभावनेतून युद्ध कसे प्रबोधक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारे, पूर्व अन् पश्चिम पाकिस्तान यांच्यातील वाढते क्रौर्य, महत्त्वाच्या ३ घटना, पाकिस्तानची युद्धाची सिद्धता आणि भारताची स्थिती, ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची स्थिती अन् युद्धज्वर तीव्र’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
लेखक : कमांडर विनायक शंकर आगाशे (निवृत्त), भारतीय नौसेना, नाशिक
भाग ५.
भाग ४. वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/861046.html
१३. भारतीय युद्धनौकांकडून कराची बंदरावर आक्रमण
आता क्षणोक्षणी परिस्थिती अधिक स्फोटक बनत चालली होती. भारतीय नौसेनेने कठोर पावले उचलली होती. ‘आय.एन्.एस्. त्रिशूल’, ‘आय.एन्.एस्. तलवार’ आणि ‘आय.एन्.एस्. विनाश’ या भारतीय नौसेनेच्या युद्धनौकांनी विलक्षण गतीने कराची बंदरावर धावा केला होता. डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे सर्वत्र आगी लागल्या होत्या. त्या युद्धकुंडात दुर्दैवाने ब्रिटीश व्यापारी बोट ‘हार्माटन’ आणि ‘गल्फस्टार’ ही पनामी बोट आक्रमणात सापडली. पुढे ‘गल्फस्टार’ ही बोट बुडाली.
१४. अरबी समुद्रावर समुद्रसत्ता प्रस्थापित
अरबी समुद्रावर भारतीय नौसेनेची सत्ता सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट झाली होती. ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री आणखी एक धक्कादायक घटना घडली होती. बातमी आली होती, ‘अन्वर बक्ष’ आणि ‘बाखीर’ या व्यापारी बोटींवर पाकिस्तानी सैनिक साध्या वेशात असून ते पळून जाण्याच्या बेतात आहेत.’ याच कालावधीत काही चिंताजनक घडामोडी चालू होत्या. अमेरिकन नौसेनेचे ७ वे ‘फ्लीट’ (आरमार) बंगालच्या उपसागराकडे वेगाने निघाले होते. त्या आरमारामध्ये ‘यू.एस्.एस्. एंटरप्राईस’ हे ७५ सहस्र टन वजनाचे विमानवाहू जहाज आणि त्यासह ५ विनाशिका होत्या. ७५ सहस्र टन वजनाच्या अवाढव्य अमेरिकन जहाज ‘एंटरप्राईस’ पुढे केवळ १ सहस्र ६०० टन वजनाचे भारतीय ‘विक्रांत’ जहाज हे बालक होते. ‘एंटरप्राईस’ जहाजावर १०० विमाने असून ते अणुशक्तीवर चालत होते. त्याचा वेग ३५ ‘नॉट’ असा होता.
भारतीय नौसेनेला अजून एक फटका सहन करावा लागला. अरबी समुद्रात गस्तीवर असतांना भारतीय पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘खुकरी’ ही पाकिस्तानी नौसेनेने बुडवली. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पूर्व पाकिस्तानमध्ये ९३ सहस्र पाकिस्तानी सैन्यासह जनरल नियाझी यांनी भारतीय सेनेच्या जनरल अरोरा यांच्यापुढे शरणागती पत्करली. भारताने युद्धविरामाची घोषणा केली.
१५. बांगलादेशाची निर्मिती
अमेरिकेचे ७ वे आरमार बंगालच्या उपसागरात पोचण्यापूर्वी पाकिस्तानी सैन्याची शरणागती आवश्यक होती. जर अमेरिकन आरमार शरणागतीपूर्वी बंगालच्या उपसागरात पोचले असते, तर युद्धाची दिशाच पालटली असती. त्यामुळे भारतीय सैन्य दलांनी सर्व बाजूंनी मारा करून पाकिस्तानी सैन्याला शरणागतीखेरीज दुसरा मार्ग ठेवला नाही. भारतीय युद्धविराम घोषणेमुळे अमेरिकेच्या ७ व्या आरमाराला काहीच उद्दिष्ट राहिले नाही. अमेरिकेला स्वतःचे आरमार परत बोलवावे लागले. पाकनेही भारताच्या युद्धविराम घोषणेला दुजोरा दिला होता. अशा रितीने बांगलादेशाची निर्मिती झाली होती.
वर्ष १९७१ च्या युद्धानंतरची उपकथानकेही महत्त्वाची आहेत. भारताचा युद्धातील विजय आणि त्यातील सैन्यदलांची भूमिका अभिनंदनीय ठरली. भारत सरकारला सामुद्रिक सत्तेचे महत्त्व लक्षात आले. एक शांतताप्रिय देश असूनही शांततेचे रक्षण करण्यासाठी समर्थ सशस्त्र सैन्य दलांची आवश्यकता वादातीत ठरली. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांवरील भारताची सार्वभौमता जगताने स्वीकारली. भारताच्या लष्करी सामर्थ्याचा तशा अर्थाने हा जवळजवळ १ सहस्र वर्षांमधील पहिला विजय होता. इतिहासात अनेक युद्धे लढली गेली; परंतु केवळ दोन आठवड्यातच निर्णायकी विजय मिळवून देणारे एका स्वतंत्र देशाची निर्मिती करणारे (बांगलादेशाची) हे युद्ध आंतरराष्ट्रीय क्षितिजावर भारताला झळाळी देणारे ठरले.
भारताच्या या विजयाचे शिल्पकार होते जनरल माणेकशॉ, त्यांना पुढे ‘फील्ड मार्शल’पदी पदोन्नती देण्यात आली. या पराक्रमी योद़्ध्याच्या खणखणीत नेतृत्वाने भारताला पाकवर निर्णायक विजय तर मिळवून दिलाच, याखेरीज त्यांच्या नेतृत्वामुळे जगाच्या नकाशावर ‘शोनार बांगला’ (सोन्याचा बांगला) अवतरला होता; परंतु त्यानंतर ५० वर्षेही झाली नाहीत, तर बांगलादेशामध्ये वर्ष २०२४ मध्ये राज्यक्रांती झाली. भारताने प्राप्त करून दिलेला ‘शोनार बांगला’ विसरून दुर्दैवाने बांगलादेशाचे सरकार आणि तेथील आतंकवादी भारताविरुद्ध उठले असून बांगलादेशात ते हिंदूंचे शिरकाण करत आहेत.
(समाप्त)
संपादकीय भूमिकाभारत शांतताप्रिय देश असूनही शांततेचे रक्षण करण्यासाठी समर्थ सशस्त्र सैन्य दलांचा वापर जिहाद्यांविरुद्ध करायला हवा ! |