संपादकीय : संस्कृतमधूनच संस्कृती !
महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपचे आमदार गिरीश महाजन, सीमा हिरे, प्रशांत ठाकूर, सुधीर गाडगीळ, नीतेश राणे, प्रसाद अडसड आणि राम कदम यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. यातील गिरीश महाजन यांनी आतापर्यंत ६ वेळा संस्कृतमधून शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील या आमदारांचे अभिनंदन करावे तेवढे अल्पच आहे. ज्या संस्कृत भाषेला काँग्रेसच्या जवाहरलाल नेहरू यांनी ‘मृतभाषा’ म्हणून संबोधले, त्या भाषेत लोकप्रतिनिधी आता शपथ घेत आहेत, हे निश्चितच चांगले आहे. शपथविधीच्या वेळी आमदारांनी ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणाही दिल्या. यातील आमदार नीतेश राणे यांनी तर उघडपणे सांगितले, ‘‘मी हिंदूंच्या मतावरच निवडून आलो आहे, मला एकाही मुसलमानाचे मत पडलेले नाही.’’ त्यांनी धर्मांधांना रोखठोकपणे सांगितले, ‘‘आता हिंदुत्वनिष्ठ सरकार आले आहे. मशिदींवरचे भोंगे संबंधितांनी स्वत:हून खाली उतरवले पाहिजेत. अन्यथा ते आम्हाला उतरवावे लागतील. नोमानींची नाटके आता चालणार नाहीत. त्यांनी आताच महाराष्ट्रातून गाशा गुंडाळावा.’’ एकूणच त्यांचा रोख हा हिंदुत्वनिष्ठ शासन-प्रशासन या दिशेने आहे, हे लक्षात आले. शपथग्रहण केलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ‘विकासकामे आणि हिंदुत्व एकत्रच चालतील. ते वेगळे नाही’, असे एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सांगितले आहे.
देववाणी संस्कृत
भारताची मूळ भाषा कोणती, तर ‘देववाणी संस्कृत’, असे सांगितले जाते. संस्कृत भाषेतच वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने आहेत. संस्कृतमध्येच अनेक विषयांतील तज्ञ ऋषींनी त्यांचे संशोधन मांडणारे ग्रंथ लिहिले आहेत. आयुर्वेदाचे मूळ ग्रंथ संस्कृतमध्येच आहेत. १४ विद्या, ६४ कला यांविषयी विस्ताराने संस्कृतमध्येच लिहिलेले आहे. भारताची प्राचीनता, विशालता, ज्ञानसंपन्नता ही आपल्या ग्रंथांमध्ये आहे आणि हे ग्रंथ संस्कृतमध्येच आहेत. संस्कृतचे सध्याचे वैशिष्ट्य असे की, सध्याच्या संगणक युगात संगणकीय भाषेला संस्कृत चांगल्या प्रकारे आणि अचूकतेने लागू पडते. ‘वेदांचा काळ किती प्राचीन असेल ? त्या वेदांमध्ये कानामात्रेचाही पालट एवढ्या लाखो-सहस्रो वर्षांत झालेला नाही किंवा कुणाला करावासा वाटलेला नाही. वेदच काय, अन्य संस्कृत पुराणे, श्रुति-स्मृति यांमध्येही पालट नाही, यातून भाषेची परिपूर्णता किती असेल ?’, याची स्पष्टता येते. एवढेच कशाला, आता शालेय जीवनात अर्ध संस्कृत, पूर्ण संस्कृत घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संस्कृत पुस्तकांमधील श्लोकही किती परिपूर्ण असतात ! त्यांमध्येही पालट झालेले नाहीत. अशी परिपूर्ण भाषा संस्कृत केवळ ‘स्कोअरिंग’ (अधिक गुण मिळवून देणारा विषय) म्हणून विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. हिंदी किंवा अन्य भाषा नाही, मराठीतही पूर्ण गुण सोडाच; पण ८० हून अधिक गुण मिळण्याची शाश्वती विद्यार्थ्यांना वाटत नाही. संस्कृतमध्ये गुण मिळतील, याची निश्चिती वाटते. हासुद्धा संस्कृतच्या परिपूर्णतेचा आणि सुंदर व्याकरणाचा पुरावा नाही का ? असे असूनही संस्कृतद्वेष्ट्या तत्कालीन काँग्रेस सरकारच्या ६ दशकांहून अधिकच्या कार्यकाळात संस्कृतला अडगळीत टाकून देण्यात आले होते. ‘संस्कृत भारती’सारख्या स्वयंसेवी संस्था, काही संस्कृत जाणकार आणि पुरोहित वेदपाठशाळा यांनीच काय ती संस्कृतची धुगधुगी जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला.
संस्कृतला राजाश्रय हवा !
संस्कृतला पुरो(अधो)गाम्यांनी लाथाडण्याचे आणखी एक कारण, म्हणजे तिला भटा-ब्राह्मणांची भाषा म्हणून हेटाळणी करणे ! त्या भाषेच्या जाणकारांनी बहुजनवर्गावर अन्याय केला म्हणे ! संस्कृत मंत्रांद्वारे दिवसाचा प्रारंभ होणार्या भारतातच, ती शिकण्या-शिकवण्यासाठी काही अनुदान वा सवलती नाहीत. उर्दूसाठी मात्र लाखोंचे अनुदान आणि उर्दू भवन ! ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विझे’, असे कविवर्य कुसुमाग्रज यांनी कवितेत लिहून ठेवले आहे. संस्कृतची हेटाळणी आणि इंग्रजीची गुलामगिरी पत्करल्याचे दुष्परिणाम देशाने ६-७ दशके अनुभवले. याउलट ‘नष्ट झालेली हिब्रू भाषा हीच आपली मातृभाषा आहे’, हे लक्षात घेऊन ज्यूंनी ती सूत्रबद्ध केली, पुनर्स्थापित केली आणि तिच्या अभिमानाच्या जोरावर आज तेजस्वी, ज्वलजहाल इस्रायल या राष्ट्राची निर्मिती केली आहे.
संस्कृतमधील विपुल ग्रंथसंपदा नालंदा, तक्षशिला येथील मोठी ग्रंथालये आक्रमक जिहादींनी नष्ट करून भारतियांना ज्ञानाला पोरके केले आहे. काही विद्या, कलांचे ज्ञान त्यामध्ये निश्चितपणे नष्ट झाले आहे. काही गूढ श्लोक, गूढ विद्या हेही ग्रंथ जाळल्यामुळे नष्ट झाले आहे; म्हणून इंग्रजीसारख्या परकीय भाषेकडे वळण्याचे कारण नाही; कारण अद्यापही संस्कृतमधील अनेक ग्रंथ, ग्रंथभांडार उपलब्ध आहे. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी सिद्ध केलेली राजमुद्रा संस्कृतमध्येच होती. त्यांनीही मराठीत राजव्यवहारकोष निर्माण केला होता. स्वतंत्र भारतात मग असे काय झाले की, संस्कृत गडप झाली ? याचे कारण एकच संस्कृतला राजाश्रय न मिळणे आणि संस्कृतचा अभिमान बाळगणारे नव्हे, तर तिचा द्वेष करणारे सत्तारूढ झाले.
कोणतीही भाषा, लोककला, उद्योग-व्यवसाय, संस्कृती ही राजाश्रयाने वाढते, विकसित होते. परकीय आक्रमणे होण्यापूर्वी भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते हे संस्कृतचे जाणकार, संस्कृतचे रक्षणकर्ते होते. मोगलांच्या काळात हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी तर ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ २ खंडांमध्ये वयाच्या १४ व्या वर्षी लिहिला आहे. या ग्रंथात प्रशासन कसे चालवावे ? काय नियम असावेत ? याचे विवेचन केले आहे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना संस्कृतचे जे महत्त्व वयाच्या १४ व्या वर्षी लक्षात येते, ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दशके गेल्यावरही शासनकर्त्यांना लक्षात येत नाही का ? संस्कृत भाषा युगानुयुगे टिकून आहे; कारण तिच्यात चैतन्य आहे. संस्कृत भाषा आत्मसात् करून, शिकून आणि त्या भाषेत व्यवहार, राजव्यवहार करून सहस्रो वर्षे राज्ये टिकली, त्या त्या वेळी प्रगल्भ संस्कृतीचा विकास झाला; कारण कसे वागायचे ? कसे बोलायचे ? व्यवहार कसा करावा ? याचे ज्ञान देणारे ग्रंथ संस्कृतमध्ये होते. लोकांची भाषा संस्कृत, तर सर्वकाही सुसंस्कृतच होणार ! ज्या भाषेत एकही शिवी नाही, ती भाषा आत्मसात् केल्यावर आणि बोलीभाषा बनल्यावर लोक कशाला एकमेकांना शिव्यांची लाखोली वहातील ? त्यामुळे लोकप्रतिनिधींनी संस्कृतमध्ये शपथ घेऊन न थांबता तिचा वापर शाळांपासून नोकरी, व्यवसाय आणि प्रशासन इथपर्यंत कसा होईल ? यासाठी कृतीशील झाले पाहिजे. आपल्यात संस्कृत भाषा नाही, ही प्रत्येक भारतियातील उणीव भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास भारतीय संस्कृती टिकेल, वाढेल आणि बहरेलही !
संस्कृतला राजाश्रय मिळण्यासाठी आणि ती दैनंदिन जीवनाचा भाग होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होणे आवश्यक ! |