Foreign Minister S. Jaishankar : युरोपीय नेते भारताला रशिया आणि युक्रेन यांच्याशी चर्चा चालू ठेवण्यास सांगत आहेत ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर
दोहा (कतार) – रशिया-युक्रेन युद्धामुळे १२५ देश पीडित झाले आहेत. युद्धामुळे विकसनशील देशांना महागाई, अन्न, इंधन आणि खतांच्या चढ्या किमतींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही आठवडे मी युरोपीय नेत्यांनाही याविषयी बोलतांना पाहिले आहे. हे युरोपीय नेते आम्हाला रशिया आणि युक्रेन यांच्याशी चर्चा चालू ठेवण्यास सांगत आहेत. आता काळाची सुई युद्धाऐवजी संवादाकडे सरकत आहे. आम्ही आपापसांत समान दुवे शोधत आहोत, ज्याचा योग्य वेळ आल्यावर उपयोग करता येईल. आपल्या आजूबाजूला संघर्ष वाढत असल्याने मुत्सद्देगिरी अल्प न करता ती आणखी वाढवणे ही काळाची आवश्यकता आहे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे आयोजित संमेलनात केले.
ब्रिक्स चलनाचा कोणताही विषय नाही ! – डॉ. जयशंकर यांनी केले स्पष्ट
‘ब्रिक्स’ (ब्राझिल, रशिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या देशांची संघटना) चलनाविषयी डॉ. जयशंकर म्हणाले की, आम्ही ब्रिक्समधील आर्थिक व्यवहारांवरही चर्चा करतो; पण अमेरिकी डॉलरला दुर्बल करण्याची भारताची कोणतीही योजना नाही. डॉलर दुर्बल झाले, तर यामुळे दोघांच्या हितांना हानी पोचेल. भारत हा अमेरिकेचा सर्वांत मोठा भागीदार आहे.
ट्रम्प यांनी यासंदर्भात चेतावणी दिली होती. त्यावर डॉ. जयशंकर म्हणाले की, ट्रम्प यांच्या ब्रिक्सविषयीचे वक्तव्य कशाबद्दल होते, हे मला समजले नाही. आम्ही याआधी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारत कधीही ब्रिक्स चलनाच्या बाजूने नव्हता.