थोडक्यात महत्त्वाचे
भटक्या श्वानांच्या आक्रमणात महिला गंभीर घायाळ !
टिटवाळा – येथे एका गृहसंकुलाच्या परिसरात मध्यरात्री भटक्या श्वानांनी आक्रमण केले. यात ६० वर्षाची महिला गंभीर घायाळ झाली. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही महिला भिक्षेकरी किंवा कचरावेचक असण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका : भटक्या श्वानांच्या समस्येवर प्रशासन कधी नियंत्रण मिळवणार ?
वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सी प्रकल्प हाती !
मुंबई – वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक असा ८.८ कि.मी.चा पॉड (उच्च गतीने जाणारी) टॅक्सी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पाचा हा पहिला टप्पा असून त्याचे काम वर्ष २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यात बीकेसी ते शीव रेल्वे स्थानक असा विस्तार केला जाईल. या विस्तारित मार्गाच्या पूर्णत्वासाठी वर्ष २०४१ चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी !
नाशिक – सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा-बेडसे येथील शासकीय आश्रमशाळेत मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे शिक्षक नसल्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. शैक्षणिक वर्ष चालू होऊन ७ महिने होऊनही अद्याप संबंधित विषयांसाठी शिक्षक मिळालेले नाहीत. मुख्याध्यापकही अनुपस्थित असतात, अशी पालकांसह ग्रामस्थांची तक्रार आहे. केवळ इंग्रजीसाठी शिक्षक नसल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिका : विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्यांवर कारवाई हवी !
‘एशियन पेंट’च्या नावाखाली मद्य तस्करी
ठाणे – ‘एशियन पेंट’ची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने शिळफाटा येथे जप्त केला. पोलिसांनी कंटेनर चालक पूनमा राम गोदारा याला अटक केली आहे.
कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित ६०० खोके विदेशी व्हिस्की आणि रम, तर बिअरचे ११० खोके असा ५५ लाख ६९ सहस्र रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला.
संपादकीय भूमिका : असा खोटेपणा करणार्यांना कठोरात कठोर शिक्षाच करायला हवी !
शिक्षकाकडून अल्पवयीन मुलांवर अत्याचार !
अंबरनाथ – येथे एका सेवाभावी संस्थेच्या शाळेतील शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, तसेच गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका : अशांना शाळेतून पदच्युतच करायला हवे !