इ.व्ही.एम्.विषयी अपसमज पसरवणारे आणि लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करा !
मिरज येथे भाजपची प्रांताधिकार्यांना निवेदनाद्वारे मागणी !
मिरज (जिल्हा सांगली), ७ डिसेंबर (वार्ता.) – इ.व्ही.एम्. संदर्भात अपसमज पसरवणारे लोक आणि पक्षांतील नेते यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ६ डिसेंबर या दिवशी भाजपचे सांस्कृतिक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओमकार शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली मिरज प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
महसूल साहाय्यक अधिकारी रूपेश गोपड यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष श्री. माधव गाडगीळ, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुनील खाडीलकर, गणेश चौगुले, संजय चौगुले, अनघा कुलकर्णी, प्राची पाठक आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. भारतामध्ये पूर्वीच्या काळी लोकप्रतिनिधींची निवड मतपत्रिकेद्वारे केली जात होती; पण काळ पुढे गेल्यानंतर नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आपण निवडणुका या इ.व्ही.एम्. यंत्रणेच्या वतीने घेत आहोत.
२. देशाचा व्यय वाचवणे, मतदान यंत्रणेवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यावरील ताण अल्प करणे, तसेच निकालासाठी २-३ दिवस वाट पहायला न लागणे हे पुष्कळ मोठे लाभ या मतदान यंत्राद्वारे झालेले दिसतात.
३. परंतु राज्यातील विरोधी पक्षाद्वारे इ.व्ही.एम्. हॅक होते, ‘इ.व्ही.एम्.’मध्ये घोटाळा आहे, अशा पद्धतीचे आवाहन वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांतून आणि सामाजिक माध्यमे यांतून करण्यात येत आहे.
४. वास्तविक निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी इ.व्ही.एम्.विषयी पूर्णतः निर्दोष असल्याचा खुलासा केला आहे.
५. सर्व यंत्रणा पारदर्शकतेने काम करत असतांनाही विरोधी पक्ष जनतेमध्ये अपसमज पसरवत आहे आणि इ.व्ही.एम्. संदर्भात संशय, संभ्रम आणि नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
६. याची प्रशासन आणि निवडणूक आयोगाने गंभीर नोंद घेऊन अशा अफवा पसरवणारे पक्ष, कार्यकर्ते, नेते यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.