अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला ‘मिशन अयोध्या’ मराठी चित्रपटाचा फलक प्रदर्शित !
सांगली, ७ डिसेंबर (वार्ता.) – अयोध्येच्या पवित्र भूमीशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा ‘मिशन अयोध्या’ चित्रपट २३ जानेवारी २०२५ या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. चित्रपटाचा विषय मांडणारा फलक प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या त्याचा ट्रेलर चित्रपटगृहांत दाखवला जात असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीराममंदिर स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. भक्तीभाव, राष्ट्रभक्ती आणि मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणार आहे.
निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे म्हणाले की, ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाच्या फलकामध्ये संघर्ष, भक्तीभाव आणि प्रेरणा यांचा अभूतपूर्व संगम दिसतो. आगीच्या विळख्यात झेंड्याला घट्ट पकडलेल्या व्यक्तीचा संघर्ष श्रीरामभक्तांच्या सशक्ततेचे प्रतीक आहे. ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट नसून भक्तीभावाचे सुवर्णपर्व आहे. चित्रपट अयोध्या येथे मंदिराच्या स्थापनेनंतर चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे. ‘आर्.के. योगिनी फिल्म्स् प्रॉडक्शन प्रा.लि.’च्या बॅनरखाली या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांच्या लेखन-दिग्दर्शनातून हा चित्रपट उभा राहिला आहे.