समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर !

ठाकरे गटाने हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने समाजवादी पक्षाचा निर्णय !

अबू आझमी

मुंबई – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत. ७ डिसेंबर या दिवशीच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला; मात्र विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे सूत्र उपस्थित करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. समाजवादी पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीची ही भूमिका नाकारत आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर वरील निर्णय घेतला.

अबू आझमी म्हणाले, ‘‘निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाने भूमिका पालटली आहे. ‘माझे हिंदुत्वाचे सूत्र कायम राहील’, असे ठाकरे म्हणाले. ‘बाबरी मशीद पाडणार्‍यांचे मी अभिनंदन करतो’, असे म्हणून ते आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. (हिंदूंचे श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरीचा ढाचा उभारण्यात आला, हे सत्य न्यायालयाने मान्य केल्यानंतरही अशी विधाने करणार्‍यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, हे लक्षात येते ! असे लोक या देशात निवडून येतात, ही देशासाठी धोक्याचीच घटना आहे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे कसे ठरेल ? – संपादक) त्यामुळे अशा लोकांसमवेत मी कधीही राहू शकत नाही. (निवडणुकीपूर्वी आझमी यांना याचा सोयीस्कर विसर पडला होता, हे लक्षात घ्या ! – संपादक)  शरद पवार आणि काँग्रेस यांनीही त्यांच्यासोबत रहाण्याविषयी विचार करावा. माझ्या या निर्णयाविषयी मी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे खासदार अखिलेश यादव यांच्याशी बोलणार असून आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीसमवेत राहू शकणार नसल्याची भूमिका त्यांना सांगणार आहे. इंडी आघाडीसमवेत रहायचे कि नाही, याविषयीचा निर्णय अखिलेश यादव घेतील.’’