मंत्रोच्चार, अग्निहोत्र, यज्ञ, साधना यांद्वारे पर्यावरणाचे खरे संतुलन राखले जाऊ शकते ! – शॉन क्लार्क
|
बाकू (अझरबैजान) : प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्व हे काळचक्रानुसार वर-खाली होत असते. रज-तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतो. परिणामस्वरूप पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढते. त्यामुळे जागतिक पातळीवर केवळ स्थुलातील उपायांविषयी प्रयत्न केले जात आहेत; पण ते पुरेसे नाहीत. आध्यात्मिक पातळीवरही प्रयत्न होणे अत्यावश्यक आहेत. मंत्रोच्चार, अग्निहोत्र, यज्ञ, साधना आदींद्वारे आपल्या आयुष्याची आणि पर्यावरणाची आध्यात्मिक शुद्धी होऊ शकते अन् त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉर्न क्लार्क यांनी केले.
अझरबैजानची राजधानी बाकू येथे ‘संयुक्त राष्ट्रां’नी आयोजित केलेल्या ‘सीओपी २९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या वतीने श्री. शॉर्न क्लार्क यांनी ‘सामाजिक सजगतेमुळे पर्यावरणाची हानी अल्प करता येईल का ?’, या विषयावरील संशोधन सादर करतांना यज्ञाचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रेही सादर केली. हे संशोधन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
श्री. शॉन क्लार्क यांनी पुढे सांगितले की,
१. आध्यात्मिक शुद्धतेचा अर्थात् सात्त्विकतेचा पंचमहाभूतांवर परिणाम होतो, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. नियंत्रित वातावरणात केलेल्या एका प्रयोगात ‘मंत्रोच्चारामुळे ज्योतीची उंची वाढते’, असे लक्षात आले.
२. दुसरे उदाहरण, मुंबईतील दोन सदनिकांमधील पाणी भरलेल्या बाटल्यांची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ नावाच्या उपकरणाने मोजण्यात आली. ज्या सदनिकेतील रहिवासी साधना (उपासना) करत होते, त्यांच्या पाण्याच्या बाटलीची प्रभावळ सकारात्मक आणि ज्या सदनिकेतील रहिवासी साधना करत नव्हते, त्यांच्या पाण्याच्या बाटलीची प्रभावळ नकारात्मक आढळून आली. यावरून मानवी आचरणाचा प्रभाव पंचमहाभूत आणि वातावरण यांवर पडतो, हे लक्षात येते.
३. सध्या पृथ्वीवर होत असलेले पर्यावरणातील पालट हे ९८ टक्के चक्रिय (सायक्लिकल) पालटांमुळे आहेत, तर केवळ २ टक्के मानवामुळे घडून येत आहेत. पॅरिस येथील परिषदेत पर्यावरणातील पालटांविषयी जी काही प्रारूपे आणि अंदाज बांधण्यात आले होते, त्यापेक्षा पुष्कळ अधिक वेगाने अन् तीव्रतेने पर्यावरणाचा र्हास होतांना दिसत आहे. वर्ष २००६ मध्येच या विषयावर आध्यात्मिक संशोधन करणार्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पर्यावरणाच्या या तीव्र र्हासाचे कारण केवळ स्थुलातील नसून सूक्ष्मातील, म्हणजेच आध्यात्मिकही आहे’, असे अनुमान काढले होते.
वातावरणातील पालटांची तीव्रता न्यून करण्याचा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा प्रयत्न विशेष कौतुकास्पद !‘सीओपी २९’ या परिषदेत ‘प्राचीन भारतीय शास्त्रांवर आधारित आध्यात्मिक सूत्रांच्या साहाय्याने वातावरणातील पालटांची तीव्रता न्यून करण्याचा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहे’, असे मत ‘आय.एस्.आर्.एन्.’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. संतोष गुप्ता आणि पर्यावरणतज्ञ अन् ‘कर्मा लेकलँड’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. आश्वनी खुराना यांनी व्यक्त केले. |
गेल्या ८ वर्षांत‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने २० राष्ट्रीय आणि ९६ आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला ‘उत्कृष्ट सादरीकरणा’चे पुरस्कार मिळाले आहेत. |