प.पू. भक्तराज महाराज यांचा लाभलेला सत्संग, वेगवेगळ्या भेटींत त्यांनी दिलेले आशीर्वाद आणि त्या आशीर्वादात्मक बोलांची आलेली प्रचीती !

‘मागील २ भागांत मी ‘माझ्याकडून साधना चालू होणे आणि आतापर्यंत मी साधनेत टिकून रहाणे’, यांचे कारण म्हणजे प.पू. बाबांच्या संबंधीची मला वाटलेली मूलभूत सूत्रे थोडक्यात मांडली आहेत. त्यासोबत ‘काही प्रसंग, उदाहरणे, तसेच मनात झालेली प्रक्रिया मांडली, तर ‘ती सूत्रे स्पष्ट होणे साहाय्यभूत ठरेल’, असे मला वाटते. प.पू. बाबांच्या देहत्यागानंतरही त्यांच्या उपदेशांचे कधी कधी माझ्याकडून चिंतन होते आणि त्यातून केवळ साधनेसाठी प्रयत्न करायला उभारी येते, असे नव्हे, तर कधी कधी त्या सूत्रांतून एखादा नवा बोध आपोआप मिळतो. त्यामुळे पुढील लिखाण करत आहे. 

 या भागात ‘प.पू. बाबांचे श्रेष्ठत्व माझ्या बुद्धीला पटणे, त्यांच्या भजनांचा माझ्या मनावर झालेला खोलवर परिणाम, प.पू. बाबांची प्रथम भेट आणि त्यांनी अध्यात्माचे केलेले अमूल्य मार्गदर्शन’, असे विविध विषय आले आहेत.

भाग ३.

भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/859212.html

प.पू. भक्तराज महाराज

७. प.पू. भक्तराज महाराज यांनी आम्हाला त्यांना दूरभाष करून त्यांच्याशी बोलण्याची सवय लावणे 

प.पू. बाबांनी त्यांच्या पहिल्या दर्शनाच्या वेळी त्यांचे स्वतःचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ मला द्यायला सांगितले आणि माझे ‘व्हिजिटिंग कार्ड’ मागितले होते. असे झाले, तरी सांगलीला आल्यानंतर आम्ही इंदूरला त्यांना दूरभाष केला नाही. मला वाटायचे, ‘आपण त्यांच्याशी दूरभाषवर काय बोलणार ? आपल्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही.’ एक मासानंतर अकस्मात् एक भक्त आले आणि म्हणाले, ‘‘मी इंदूरला जाऊन आलो. प.पू. बाबांनी तुम्हाला प्रसाद दिला आहे. ते तुमची सारखी आठवण काढतात. ‘तुम्ही दूरभाष का करत नाही ?’, असे त्यांनी मला परत परत विचारले. तुम्ही आजच प.पू. बाबांना दूरभाष करा !’’

आम्ही प.पू. बाबांना दूरभाष केला. प.पू. बाबांनीही मला तोच प्रश्न विचारला. मी ‘तत पप’ करत उत्तर दिले, ‘‘बाबा, तुम्ही एवढे मोठे आणि माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. मला ‘काय बोलायचे ?’, तेही समजत नाही. तुमचा वेळ अनमोल आहे.’’ हे ऐकून प.पू. बाबा पुष्कळ हसले. नंतर मी त्यांना नियमित दूरभाष करू लागलो. प.पू. बाबांकडून इंदूरचा शेवरूपी प्रसाद जवळपास प्रत्येक मासात कोणत्या ना कोणत्या मार्गाने आम्हाला मिळत राहिला.

डॉ. दुर्गेश सामंत

८. प.पू. बाबांनी ‘तू कायम ईशचिंतनात असतोस, तुझे कधी अकल्याण होणार नाही’, असे सांगून साधनेची दिशा देणे आणि त्या दिशेने वाटचाल करण्यातील भय न्यून करणे

जुलै १९९४ मध्ये प.पू. बाबांकडे जातांना आणि त्यांच्या जवळ असतांना माझ्या मनात एकच प्रार्थना असायची, ‘माझा नामजप केवळ तुमच्या कृपेने होऊ शकतो. तोच तुम्ही पक्का करून घ्या.’ प.पू. बाबांच्या दर्शनाला गेलो की, ‘सतत नामजप कसा होत राहील’, असा विचार माझ्या मनात असे. याचे कारण, म्हणजे त्यांचे ‘येथे सर्व आहे, पाहिजे ते आणा !’, हे वाक्य मनात असे. एरव्ही ‘नामजप कसा वाढेल’, याविषयी भजनांतून समजून घेणे, तसेच ‘ईश्वराचे स्वरूप काय ? धर्म म्हणजे काय ?’, यांविषयीचेच विचार माझ्या मनात सतत असत.

नंतर एकदा प.पू. बाबा अकस्मात् मला म्हणाले, ‘‘तू नित्य ईशचिंतनात असतोस. तुझे कधी अकल्याण होणार नाही !’’ यातून त्यांनी न केवळ माझी मनःस्थिती जाणली; परंतु मला पुढील दिशाही सांगितली आणि त्या दिशेने वाटचाल करण्यातील भयही न्यून केले.

९. प.पू. बाबांनी ‘तुमचा नामजप चित्ताद्वारे चालू झाला असून तो थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी थांबणार नाही’, असे सांगणे 

९ अ. श्रीरामनवमीला श्रीरामाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतांना एका भक्ताने ‘तुम्ही श्रीरामाच्या दर्शनाला न जाता थेट प.पू. बाबांच्या जवळ जाऊन तेथे फुले वहा’, असे सांगणे : रामनवमीला (९.५.१९९५ या दिवशी) आम्ही सर्व जण कांदळीला गेलो होतो. तेथे रामजन्माचा सोहळा झाल्यावर प्रथम ‘तेथील मंदिरातील श्रीरामाचे आणि नंतर दुसरीकडे बसलेल्या प.पू. बाबांचे दर्शन घ्यायचे’, अशी पद्धत होती. दोन्हीकडे फुले वहायची होती. आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो. अकस्मात् प.पू. बाबांचे एक भक्त श्री. अशोक शहा मला म्हणाले, ‘‘बाकीच्यांना श्रीरामाला फुले वाहून नंतर प.पू. बाबांकडे येऊ दे. तुम्ही श्रीरामाच्या मूर्तीकडे जाऊ नका. तुम्ही ही रांग सोडा आणि थेट प.पू. बाबांजवळ जाऊन तेथे फुले वहा; कारण श्रीराम आणि ते एकच आहेत !’’ मला त्यांचे बोलणे पटले आणि मी तसे केले.

९ आ. प.पू. बाबांना नमस्कार केल्यानंतर त्यांनी ‘तुमचा नामजप चित्तातून चालू झाला असून ‘तो बंद करणे तुमच्या हातात नाही’, असे सांगून याची प्रचीती घेण्यास सांगणे आणि अंतर्मनातून नामजप ऐकू येणे : मी प.पू. बाबांपाशी जाऊन त्यांना वाकून आणि त्यांच्या चरणांवर फुले वाहून नमस्कार केला. तेव्हा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘आता तुमचा नामजप चित्तातून चालू झाला आहे. आता तो कधीच थांबणार नाही. तो बंद करणे तुमच्या हातात नाही. हवे तर तो बंद करायचा प्रयत्न करून पहा. मी सांगतो; म्हणून दोन वेळा प्रयत्न करून पहा आणि ‘तो तुम्हाला बंद करता येत नाही’, याची प्रचीती घ्या !’’

मी प.पू. बाबांनी सांगितल्याप्रमाणे करून पाहिले. तेव्हा ते सांगतात, ते मला पटले; कारण जेव्हा शांत होऊन केवळ ‘अंतर्मनात काय चालले आहे ?’, हे ऐकण्याचा मी प्रयत्न केला, तर मला नामजप ऐकू यायचा.

१०. प.पू. बाबांचे आज्ञापालन करू लागणे

त्यानंतर मला प.पू. बाबांच्या समवेत औदुंबर आणि नृसिंहवाडी येथे जाण्याचा योग आला. तेव्हा प.पू. बाबांनी ‘दर्शनाला जा’, असे सांगितल्याविना मी मंदिरात दर्शनाला गेलो नाही. मी त्यांच्या जवळच थांबायचो.

११. देहत्यागाच्या ४ – ५ मास आधी प.पू. बाबांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा गुरुमंत्र देणे 

ऑगस्ट १९९५ मध्ये प.पू. बाबा ईश्वरपूर येथे आले होते. तेथे ते गावाबाहेर असलेल्या एका भक्ताच्या बंगल्यावर उतरले होते. दुपारची वेळ होती. सर्व जण महाप्रसाद घेऊन विश्रांती घेत होते. प.पू. बाबाही आतल्या खोलीत पहुडले होते. मी त्यांना न दिसेल, अशा रितीने त्यांच्या खोलीच्या दारात नामजप करत बसलो होतो. अकस्मात् त्यांच्या सेवेत असलेले भक्त आले आणि मला म्हणाले, ‘‘प.पू. बाबा तुम्हा दोघांना (मी आणि सौ. नंदिनी यांना) बोलावत आहेत.’’ आम्ही आत गेलो आणि त्यांच्या समोर भूमीवर बसलो. प.पू. बाबा पलंगावर पहुडले होते. ते उठले आणि मला उद्देशून म्हणाले, ‘‘तू आता ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप कर.’’ सौ. नंदिनीला ते म्हणाले, ‘‘तू ‘हरि ॐ तत्सत्’ हा जप कर !’’

१२. प.पू. बाबांनी ‘हवे ते मागा’, असे म्हटल्यावरही स्वतःकडून काही मागितले न जाणे 

१२ अ. प.पू. बाबांकडे तपासणीची सामुग्री घेऊन गेल्यावर आरंभी त्यांनी ‘इसीजी’ काढून घेण्यास नकार देणे आणि नंतर ‘माझी सर्व तपासणी करा’, असे सांगणे : जानेवारी १९९५ मधील प्रसंग आहे. प.पू. डॉक्टरांनी ‘प.पू. बाबांच्या दर्शनाला जातांना ‘इसीजी’ (इसीजी, म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम – या चाचणीद्वारे हृदयस्पंदन आलेख काढला जातो.) काढायचे यंत्र, तसेच अन्य तपासणीची सामुग्री घेऊन जा’, ही सूचना आरंभीच दिली होती. त्यामुळे मी प.पू. बाबांकडे जातांना प्रत्येक खेपेला ‘इसीजी’ काढायचे यंत्र आणि अन्य तपासण्यांची सामुग्री घेऊन जात असे. प्रथम त्यांनी ‘इसीजी’ काढून घेण्यास मला नकार दिला. ४ – ५ वेळा मी सर्व साहित्य घेऊन गेल्यानंतर एका भेटीच्या वेळी ते म्हणाले, ‘‘मला कोण पहात नाही. माझी सर्व तपासणी करा. माझा ‘इसीजी’ काढा.’’

१२ आ. प.पू. बाबांच्या बोलण्याचा विचार न करता केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करता येऊ लागणे : प.पू. बाबांकडे असतांना मी मनाशी ठरवले होते, ‘ते आपल्याला जे सांगतात, तेवढे आज्ञा म्हणून करायचे आणि ते ‘इतरांच्या संबंधी काही बोलतात’, त्या संदर्भात आपण काही विचार करायचा नाही. विचार आला, तरी तो लगेच थांबवायचा.’ त्यामुळे ‘मला कोण पहात नाही’, या त्यांच्या बोलण्याविषयी माझ्या मनात काही आले नाही.

१२ इ. प.पू. बाबांना तपासतांना ‘त्यांचा नामजप हृदयापासून होतो का ?’ हे पहाण्यापेक्षा ‘त्यांनी सांगितले तेवढेच करावे’, असा विचार येणे : प.पू. बाबा एका वेगळ्या पलंगावर जाऊन पहुडले. मी त्यांना तपासायला जाऊ लागलो, तर वाटेत प.पू. रामजीदादा आणि अन्य एक भक्त (कै. रवि बोरकर) हे बसले होते. ते भक्त मला म्हणाले, ‘‘डॉक्टर, हे (प.पू. बाबा) सगळ्यांना सांगतात, ‘हृदयापासून नामजप करा. तुम्हाला संधी आहे, त्यांचा तसा नामजप होतो का ? हे जरा पहा.’’

प.पू. बाबांना ‘स्टेथोस्कोप’ने (‘स्टेथोस्कोप’, म्हणजे हृदयाचे ठोके इत्यादी तपासण्यासाठी डॉक्टर वापरतात, ते साधन) तपासणार, त्याआधी माझ्या मनातही ‘तसे करावे’, असा विचार आला; परंतु लगेच प्रतिविचार आला की, ‘हे करणारा मी कोण ?’, आपल्याला सांगितले तेवढे करावे, हे उत्तम !’ प.पू. बाबांचा ‘नामजप हृदयाच्या गतीसोबत होतो कि नाही’, हे ऐकण्याचा विचार माझ्या डोक्यात आला आणि त्याच गतीने तो गेला.

१२ ई. प.पू. बाबांनी प्रसन्न होऊन ‘काय हवे ते मागा’, असे सांगितल्यावर ‘काहीच नको’, असा विचार येणे : तपासणी झाल्यावर प.पू. बाबा दूरवर जाऊन बसले आणि मला म्हणाले, ‘‘आता रामजीला तपासा. तो वृद्ध आहे. माझ्या बरोबर असतो; पण त्याला कुणी पहात नाही (त्यांची कुणी काळजी घेत नाही.)’’ मग मी प.पू. दादांना तपासले आणि त्यांचा ‘इसीजी’ काढला. अशा रितीने प.पू. बाबांनी तेथे जे जे होते, त्या सगळ्यांची तपासणी करून घेतली. हे सर्व प.पू. बाबांच्या समोरच चालले होते. शेवटची तपासणी झाल्यावर मी आवरत असतांना ते लांबूनच मला म्हणाले, ‘‘डॉक्टर, मी प्रसन्न आहे. तुम्ही काय हवे ते मागा, मी देतो.’’ मी चमकलो. मनात एक विचार येऊन गेला, ‘मला हे (स्वतःचे रुग्णालय) हवे का ? ते (म्हणजे ‘सौ. नंदिनीला मूल कधी होणार ?’ याचा ताण होता. त्यामुळे मूल) हवे का ? (याचे उत्तर लगेच मनात आले की, ‘हे प्रारब्ध आहे. त्यात मागण्यासारखे काय ?’) प्रत्येकाचे उत्तर ‘नाही’ असेच आले. त्यात अगदी ‘मोक्ष हवा का ?’, हाही प्रश्न मनात येऊन गेला. त्याचे उत्तर मनात आले की, प.पू. बाबांचे चरणदर्शन झाले. याहून मोक्ष काय वेगळा असणार ?)’ त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असेच आले.

१२ उ. प.पू. बाबांनी ‘काय हवे ?’, असे पुनःपुन्हा विचारल्यावर ‘काहीच मागू नये’, असे वाटणे आणि ‘केवळ तुमचे आशीर्वाद असू देत’, असे सांगणे : मी दूर असल्याने प.पू. बाबांना मोठ्या आवाजात बोलावे लागत होते. हे पाहून मी त्यांच्याजवळ जाऊ लागलो, तर वाटेत प.पू. दादा आणि एक भक्त बसले होते. ते हळू आवाजात मला म्हणाले, ‘‘प.पू. बाबांकडे भक्कम काही तरी मागा. सोडू नका. ते कधी काही कुणाला देत नाहीत. आज ‘देतो’ म्हणतात, तर ही संधी सोडू नका.’’

मी प.पू. बाबांच्या समोर गेल्यानंतर ते म्हणाले, ‘‘तुम्ही भक्तराजला ओळखले नाही. हा जगातील काहीही देऊ शकतो. तुम्ही हवे ते मागा !’’ त्यांनी असे सांगूनही मला ‘काही मागावे’, असे वाटले नाही. मी म्हणालो, ‘‘आपले आशीर्वाद असू देत.’’ प.पू. बाबा हसले आणि म्हणाले, ‘‘ते तर कायम आहेतच. मागा काही.’’ मी म्हणालो, ‘‘काही नको. केवळ तुमचे आशीर्वाद असू देत.’’ ते म्हणाले, ‘‘ठीक आहे.’’

१३. प.पू. बाबांनी पुनःपुन्हा सांगूनही ‘काहीच मागावेसे न वाटणे’, यामागील कारणमीमांसा  

अ. त्यानंतर दीर्घकाळ मला हा प्रसंग आठवत होता. ‘माझ्या मनात इतक्या इच्छा आहेत, तर मला त्या वेळी काहीच मागावेसे का वाटले नाही ?’ याचे कारण शोधण्याचा मी प्रयत्न करत राहिलो. प्रथम मला वाटले, ‘मी किती त्यागी आहे ! मी अभ्यासवर्गात सांगितल्यानुसार चांगल्या साधकाप्रमाणे केले.’

आ. नंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आले, ‘मनात इच्छा न होणे, हीसुद्धा प.पू. बाबांचीच इच्छा !’ (या जाणवलेल्या उत्तरात शास्त्र स्पष्ट होत नव्हते; म्हणून मनात असमाधान होते.)

इ. आता अलीकडे काही मासांपूर्वी माझ्या लक्षात आले, ‘मी प्रत्यक्ष समाधान आणि परिपूर्ण तृप्ती यांच्या मूर्तीमंत रूपासमोर उभा होतो. त्यांच्या सान्निध्यात काही इच्छा होणेच अशक्य आहे.’ (त्याची शास्त्रीय प्रचीतीही याच काळात वाचनातून मला मिळाली. गीतेमध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगतांना म्हटले आहे की, ‘तो आत्मसाक्षात्कारी स्वतःमध्येच तृप्त असतो.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२४)