‘महारेरा’ने बांधकाम व्यावसायिकांकडून हानीभरपाईपोटी २०० कोटी रुपये वसूल केले !
पुणे – बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध असणार्या ग्राहकांच्या तक्रारींवरील सुनावणीतून त्यांना हानीभरपाई दिली जाते. ‘महारेरा’ने (महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिककरण) हानीभरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी १ सहस्र १६३ वॉरंट (नोटीस) बांधकाम व्यावसायिकांना पाठवली आहेत. यापैकी १४९ प्रकल्पांतील २८३ वॉरंटचे २०० कोटी २३ लाख रुपये वसूल केले आहेत. मुंबई उपनगरातून ७६ कोटी ३३ लाख रुपये, मुंबई शहर विभागातून ४६ कोटी ४७ लाख रुपये, तर पुणे विभागातून ३९ कोटी १० लाख रुपयांची वसुली केली आहे. अजूनही ५०५ कोटी रुपयांची वसुली होणे शेष आहे. महाराष्ट्र भूमी महसूल अधिनियमातील प्रावधानांच्या अन्वये भूमी महसुलाची थकबाकी वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयांना असतात. महारेराने असे वॉरंट संबंधित जिल्हाधिकार्यांकडे पाठवले आहेत. महारेराने महसूल खात्यातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या साहाय्याने या सर्व प्रकरणांचा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे या वसुलीला गती आली आहे. आवश्यकतेनुसार इतरत्रही अशा नियुक्त्या करण्याचा विचार करण्यात येईल, असे महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी सांगितले.