लोणावळा नगर परिषदेकडून सांडपाणी थेट नद्यांत सोडल्‍याचा प्रकार उघडकीस !

लोणावळा नगर परिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍प चालू नाही

प्रतिकात्मक चित्र

पुणे – लोणावळा नगर परिषदेकडून सांडपाण्‍यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नाल्‍यामध्‍ये सोडले जात आहे. हे सांडपाणी नाल्‍यातून पुढे इंद्रायणी आणि उल्‍हास या २ नद्यांमध्‍ये मिसळून जलप्रदूषण होत असल्‍याची गंभीर गोष्‍ट उघडकीस आली आहे. लोणावळा नगर परिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍प चालू नसल्‍याची गोष्‍ट महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अधिकार्‍यांनी केलेल्‍या पडताळणीत समोर आली आहे. नगर परिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पासाठी स्‍वतंत्र वीजजोडणी घेतली नसल्‍याची  गोष्‍टही उघडकीस आली आहे. राष्‍ट्रीय हरित न्‍यायाधिकरणाच्‍या आदेशानुसार नगर परिषदेने आपल्‍या कार्यक्षेत्रातील सर्व सांडपाण्‍यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असून याचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी नगर परिषदेला महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावून दंडात्‍मक कारवाई करण्‍याची चेतावणी दिली आहे. तसेच उत्तर देण्‍यास १५ दिवसांचा कालावधी देण्‍यात आला आहे. (केवळ चेतावणी देऊन न सोडता महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर काय कारवाई करणार ? तेही जनतेला समजायला हवे. – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • सांडपाणी प्रक्रियेच्‍या प्रकल्‍पासाठी स्‍वतंत्र वीजजोडणी न घेणे हा लोणावळा नगर परिषदेचा अक्षम्‍य हलगर्जीपणाच होय !
  • ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, अशी ओरड करणारे तथाकथित पर्यावरणवादी याविषयी काही बोलणार का ?