कार्तिकी एकादशी विशेष बससेवेमधून पी.एम्.पी.ला ९८ लाख रुपयांचे उत्पन्न !
भविष्यातही चांगल्या सुविधा देण्याचा पी.एम्.पी.कडून संकल्प व्यक्त !
पुणे – आळंदी येथील कार्तिकी एकादशी उत्सव आणि संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी पी.एम्.पी.कडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातून पी.एम्.पी.ला ९८ लाख ८७ सहस्र १२२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या सेवेचा एकूण ७ लाख ४० सहस्र ३१८ प्रवाशांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती पी.एम्.पी. प्रशासनाने दिली. पी.एम्.पी.कडून नोव्हेंबरमध्ये २४ ते २९ दरम्यान एकूण ३४३ बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये ११४ नियमित बस आणि २२९ अतिरिक्त बसचा समावेश होता, तसेच या कालावधीत आवश्यकतेनुसार मध्यरात्री बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आळंदी येथे प्रतिवर्षी होणार्या या धार्मिक सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित रहातात. त्यांना सोयीस्कर आणि सुलभ प्रवासासाठी पी.एम्.पी.कडून प्रतिवर्षी अशा विशेष सेवा पुरवल्या जातात. यंदाच्या यशस्वी आयोजनामुळे पी.एम्.पी. प्रशासनाने भाविकांचे आभार मानले असून भविष्यातही अधिक चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.