साधकांना आधार देणार्या आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत (वय ५८ वर्षे) !
‘मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी (७.१२.२०२४) या दिवशी आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत यांना ५८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधिकेने प्रयत्न केल्यावर तिच्यामधील स्वभावदोष न्यून होणे
मी माझ्या साधनेतील अडचणींविषयी आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांच्याशी बोलते. त्या माझ्या अडचणींवर योग्य दृष्टीकोन देऊन मला साधनेत साहाय्य करतात. मी गेल्या अनेक वर्षांपासून ‘मनोराज्यात रमणे’ हा स्वभावदोष घालवण्यासाठी प्रयत्न करत होते; पण मला त्यात यश येत नव्हते. मी माझ्यामधील ‘मनोराज्यात रमणे’ या स्वभावदोषाविषयी नंदिनीताईंना सांगितले. तेव्हा त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मला पुष्कळ लाभ झाला. आता माझ्यामधील हा स्वभावदोष उणावला आहे.
२. साधकांना आधार वाटणे
एकदा नंदिनीताईंनी मला सांगितले, ‘‘तुला कधीही अडचण वाटली, तर मला संपर्क कर.’’ मी त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलल्यावर त्या प्रत्येक वेळी मला वेळ देऊन माझी अडचण सोडवतात. खरेतर त्यांच्याकडे दायित्वाच्या अनेक सेवा आहेत. त्यांच्या आई (श्रीमती सुनंदा सामंत, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८७ वर्षे) आणि सासूबाई (श्रीमती मीरा सामंत, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ९१ वर्षे) दोघीही वयस्कर असल्याने ताईंना त्यांचीही सेवा करावी लागते. ताई मला वेळ देऊन माझ्या मनाचे समाधान होईपर्यंत मार्गदर्शन करतात.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
काही मासांपूर्वी नंदिनीताईंचा अपघात झाला होता. तेव्हा त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात भरती केले होते. अशा गंभीर स्थितीत रुग्णालयात असतांनाही त्यांनी स्वयंसूचनांची १५ सत्रे पूर्ण केली. त्या स्वयंसूचना सत्रे, सारणी लिखाण (टीप) आणि व्यष्टी साधनेच्या संदर्भातील अन्य सर्व प्रयत्न प्रतिदिन पूर्ण करतात.
(टीप – सारणी लिखाण : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती आणि विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती किंवा विचार लिहिणे)
४. सकारात्मक वृत्ती
नंदिनीताईंच्या एका हाताला अपघातामुळे इजा झाली आहे. ताईंना त्या हाताचा वापर करता येत नाही. त्यांचा हात ठीक व्हायला बराच कालावधी लागणार आहे; मात्र त्याविषयी त्यांचे कोणतेही गार्हाणे नसते. त्या पुष्कळ सकारात्मक आहेत. ‘आहे त्या परिस्थितीत साधनेचे प्रयत्न कसे करू शकतो ?’, याकडेच त्यांचे लक्ष असते.
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेने मला नंदिनीताई आध्यात्मिक सखी म्हणून लाभल्या’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. ‘नंदिनीताईंची आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२४)