UK Most Popular Baby Name : ‘मुहम्मद’ बनले ब्रिटनमधील सर्वांत लोकप्रिय नाव !

ब्रिटनमध्ये गेल्या २० वर्षांत मुसलमानांच्या लोकसंख्येत दुपटीहून होत असलेल्या वाढीचा परिणाम !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये ‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०२३ मध्ये ‘मुहम्मद’ हे नाव सर्वाधिक मुलांना ठेवण्यात आले. ४ सहस्र ६६१ मुलांची या नावाने नोंदणी झाली होती. हे २०२२ च्या तुलनेत ४८४ हून अधिक आहे. एका ख्रिस्ती देशात मुसलमान नाव वरच्या स्थानी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्ष २०१६ पासून ‘मुहम्मद’ नाव मुलांच्या प्रमुख १० नावांमध्ये येत होते; मात्र आता ते पहिल्या क्रमांकावर आले आहे. दुसरीकडे मुलींच्या पहिल्या ३ प्रमुख नावांमध्ये ऑलिव्हिया, एमिलिया आणि इस्ला यांचा समावेश आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही तिन्ही नावे याच क्रमांकावर आहेत.

‘मुहम्मद’ हे नाव ब्रिटनमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे; कारण तेथे मुसलमानांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. वर्ष २००१ मध्ये ब्रिटनमध्ये १५ लाख मुसलमान होते जे वर्ष २०११ मध्ये २७ लाख आणि वर्ष २०२१ मध्ये ३९ लाख झाले. याखेरीज मोहम्मद फराह, मोहम्मद अली, मोहम्मद सलाह यांसारख्या क्रीडा व्यक्तिमत्त्वांच्या नावामुळेही लोक हे नाव ठेवत आहेत. ‘मुहम्मद’ हे इस्लामच्या शेवटच्या प्रेषिताचे नाव आहे. इंग्रजीमध्ये, मुहम्मद हे ‘मोहम्मद’ आणि ‘महंमद’ या प्रकारेही लिहिले जाते. मुहम्मद हे नाव इस्लामच्या ‘हमद’ या शब्दावरून आले आहे. याचा अर्थ ‘स्तुती करणे’ असा होतो.

संपादकीय भूमिका

  • भारतातही या संदर्भात सर्वेक्षण केले, तर वेगळे चित्र दिसणार नाही !
  • जर ब्रिटनमध्ये मुसलमानांची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढत असेल, तर असे भारतातही होतच असणार, यात शंका नाही. उद्या ब्रिटन आणि भारत इस्लामी राष्ट्र झाले, तर आश्‍चर्य वाटू नये !